देशामधील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस कामामध्ये व्यस्त आहेत. दिल्लीमध्येही करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने डॉक्टरांचे काम वाढले आहे. याच डॉक्टरांना दिलासा देण्यासाठी टाटा सन्स कंपनीने आता पुढाकार घेतला आहे. टाटा सन्सच्या मालकिच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) मुंबईतील करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आपल्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील रुम्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. ताज ग्रुपच्या वांद्रे आणि कुलाबा येथील हॉटेलमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी रुम्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रतन टाटा यांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी ५०० कोटी आणि टाटा सन्सकडून एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

“सध्याच्या या संकटाच्या परिस्थितीमध्ये समाजाप्रती आयएचसीएलची जबाबदारी काय आहे हे आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी झटणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय आम्ही करत आहोत. मुंबईतील पाच हॉटेलमध्ये डॉक्टरांसाठी रुम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ताज महाल पॅलेस, ताज लॅण्ड्स एण्ड, ताज सांताक्रुझ, द प्रेसिटेंड आणि अंधेरी एमआयडीसीमधील जिंजर हॉटेल. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. या संकटाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या सोबत काम करण्यास तयार आहोत,” असं आयएचसीएलच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही यासंदर्भात ट्विट केलं. “करोना विषाणूच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेससाठी टाटा समुहाच्या कुलाब्यातील ताज हॉटेल आणि वांद्र्यातील ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. माननीय रतन टाटा आणि टाटा ग्रुप यांचे खूप आभार,” असं सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही या निर्णयासाठी टाटा ग्रुपचे कौतुक केलं आहे.

यासंदर्भातील अनेक ट्विट व्हायरल झाले आहेत. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर डॉक्टरांसाठी लावण्यात आलेल्या वेलकम नोटपासून ते रुममधील डॉक्टरांचे फोटोही ट्विटवर व्हायरल झाले आहेत.

याआधीही मुंबईमध्ये रतन टाटांच्या मालकीच्या असणाऱ्या ताज ग्रुपच्या हॉटेल्सने डॉक्टरांना आणि आरोग्य विभागाच्या कार्मचाऱ्यांना जेवणाची पाकिटं वाटली होती. मुंबई महानगरपालिकेनेच यासंदर्भात ट्विटवरुन माहिती दिली होती. महापालिकेने ताज कॅटर्सच्या मदतीने शहरातील सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांना, डॉक्टरांना, नर्सना आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना अन्नाची पाकिटं वाटल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं होतं. विमानात दिलं जात त्याप्रमाणे या पाकिटांमध्ये सॅलेड, भात, डाळ, भाजी, पाव, कॅडबरी, अमुल बटर, पाण्याची बाटली अशा गोष्टी होत्या. दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना ताज हॉटेलकडून जेवण पुरवलं जाणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली आले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उद्योगपती हर्ष गोयंका यांनी या गोष्टीचं ट्विटवरुन कौतुक केलं होतं.

रतन टाटा यांनी ५०० कोटींची मदत जाहीर करण्याआधीच टाटा ग्रुपने आपल्या कंपनीच्या सर्व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे आणि हातावर पोट असणाऱ्या कामागारांचे पूर्ण वेतन देण्याच निर्णय घेतला होता. देशातील टाटा उद्योग समुहाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार देण्यात येईल अशी घोषणा कंपनीने केली होती. विशेष म्हणजे लॉकडाउनदरम्यान कंपन्या बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी सर्वांना पगार देण्यात येणार आहे.

Story img Loader