मनोरंजन मैदानाचे आरक्षण असलेल्या मैदानावर उभी असलेली दहिसर येथील शाळा महापालिकेने तब्बल २२ वर्षांनी बेकायदा ठरविली असून पालिकेने शाळेच्या प्रशासनाला नोटीसही बजावली आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेला ‘आदर्श शाळा’ म्हणून गौरविले आहे.
दहिसर पूर्व येथील आनंद नगरमध्ये १९८९ मध्ये ‘मातृछाया’ ही गुजराती आणि इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेमध्ये ३२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेला ‘आदर्श शाळे’चा पुरस्कार देऊन गौरविले होते. या शाळेत पदवी महाविद्यालयाची परवानगीही सात वर्षांपूर्वी मिळाली आहे.
मात्र आता परीक्षा ऐन तोंडावर आल्या असताना पालिकेने ही शाळा बेकायदा असल्याची नोटीस ‘मातृछाया’च्या प्रशासनाला पाठविली आहे. या नोटिशीचे वृत्त समजताच पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. ऐन परिक्षेत विद्यार्थ्यांनी जायचे कुठे, असा सवाल पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काही पालकांनी महापौर सुनील प्रभू यांची भेट घेतली.
ही शाळा २२ वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. त्यावेळी ही शाळा बांधण्यासाठी परवानगी कशाच्या आधारावर देण्यात आली हे तपासून कायद्याच्या चौकटीत राहून याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सुनील प्रभू यांनी पालकांना दिले. पालिकेची नोटीस मिळताच ‘मातृछाया’ शाळेच्या प्रशासनाने कायदेशीर सल्ला घ्यायला हवा होता, असेही महापौर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा