शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराची जागा मोकळी करून ताब्यात घेण्याच्या मुद्यावरून पालिका आयुक्त सीताराम कुं टे त्रस्त असताना आता शिवाजी पार्कच्या नामकरणाच्या विषयामुळे त्यांचा ताप आणखीच वाढला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आता थेटे राज्याच्या मुख्य सचिवांकडेच थेट मार्गदर्शन मागितले आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारासाठी महापौर व शिवसेना खासदारांनी परवानगी मागितल्यामुळे विशेष बाब म्हणून एक दिवसासाठी महापालिकेने जागा दिली. आता या गोष्टीला पाऊण महिना उलटल्यानंतरही शिवसेना ही जागा सोडण्यास तर तयार नाहीच; उलट अंत्यसंस्काराच्या जागी स्मारक उभारण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. परिणामी पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक पालिका आयुक्तांनी महापौर सुनील प्रभू व खासदार संजय राऊत यांना जागा रिकामी करून देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र या नोटिशीची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न आता कुंटे यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
अन्य अनधिकृत बांधकामांवरील करावाईप्रमाणे ही कारवाई करता येणार नाही. या मुद्दय़ावरून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलीस आयुक्तांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दाखवली असली तरी ‘वाईटाचे धनी’ होण्यास आयुक्त तयार नसल्याचे पालिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर कुंटे यांनी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांना पाठविलेल्या पत्रात ३८ मजूर, मुकादम व एका जेसीबीच्या सहाय्याने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा मोकळी करता येईल. मात्र याबाबत गोपनीयता पाळणे शक्य होणार नसल्यामुळे काहीही होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर नेमके काय करावे, अशी विचारणा आयुक्तांनी केली आहे.    

Story img Loader