तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ घाऊक बाजारातून हापूस आंबे घरी नेणाऱ्या कर्जतच्या शिवसेना नगरसेवकाला आज आपली दबंगगिरी चांगलीच महागात पडली. फळ बाजारातून बाहेर पडताना प्रवेशद्वारावर कर भरल्याची पावती मागणाऱ्या सुरक्षा रक्षकावर परवानाधारक पिस्तूल रोखल्याने कर्जतचे शिवसेना नगरसेवक नितीन नंदकुमार सावंत यांना त्यांच्या दोन कार्यकर्त्यांसह आज पोलीस कोठडीची हवा खावी लागली. त्यानंतर संध्याकाळी सीबीडी फौजदारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
 एपीएमसीच्या घाऊक बाजारातून कोणत्याही शेतमालाची खरेदी केल्यानंतर बाहेर पडताना तेथील सुरक्षा रक्षकांना समितीचा सेस भरल्याची पावती दाखवावी लागते. आज दुपारी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक नितीन सावंत यांनी फळ बाजारातून हापूस आंब्याच्या तीन पेटय़ा खरेदी केल्या आणि ते घरी जात असताना बाजार आवारातील सुरक्षा रक्षकाने त्यांना कर भरल्याची पावती मागितली. ती नसल्याने सुरक्षा रक्षक माधव पहारे यांनी त्यांना बाहेर पडण्यास अटकाव केला. त्यामुळे सावंत संतापले. त्याने सुरक्षा रक्षक व सावंत यांचे दोन कार्यकर्ते दिनेश गायकवाड आणि संतोष देशमुख यांची चांगलीच जुंपली. काही काळ वातावरण तंग झाले. तेवढय़ात संताप अनावर होऊन सांवत यांनी स्वत:कडील परवानाधारक रिव्हॉल्व्हर काढले आणि ते पहारे यांच्या कानशिलावर रोखले. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळल्याने पोलिसांना बोलवावे लागले. सावंत त्यानंतर तेथून परागंदा झाले. पहारे यांनी सावंत यांच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला. गाडीच्या क्रमांकावरून सांवत यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सावंत यांना अटक केली. सावंत यांच्यासह त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना फौजदारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना वैयक्तिक जामिनावर सोडून देण्यात आले.

Story img Loader