निवडणुकीची तारीख, आरक्षण सोडत, प्रभाग रचनेवरून गोंधळ

प्रसाद रावकर

मुंबई : येत्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार की पुढे ढकलण्यात येणार, प्रभाग फेररचना, प्रभागांचे आरक्षण कधी जाहीर होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नगरसेवक संभ्रमात आहेत. त्यामुळे निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन नगरसेवक निधीतून केलेल्या विकासकामांचे उद्घाटन आता उरकायचे की आणखी काही काळ लांबणीवर टाकायचे असा प्रश्न सध्या नगरसेवकांसमोर आहे. तूर्तास थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येताच नगरसेवक मंडळी कंबर कसून आपला आणि आसपासच्या प्रभागांवर लक्ष केंद्रीत करून नगरसेवक निधीतून विकास कामांचा सपाटा लावतात. पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मिळणारा नगरसेवक आणि प्रभाग निधी प्रभागातील कोणत्या भागात कसा आणि किती खर्च करायचा याचे नियोजन नगरसेवक मंडळी आधीपासूनच करून ठेवतात. तसेच आरक्षणाची टांगती तलवार लक्षात घेऊन नगरसेवक मंडळी प्रशासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी काही रक्कम आसपासच्या प्रभागांमधील विकासकामांवर खर्च करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात.

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित होती. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना नगरसेवकांना प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध केला होता. तसेच काही नगरसेवकांनी विशेष निधीही पदरात पाडून घेतला होता. निवडणुकीपूर्वी आपल्या प्रभागांमध्ये या निधीतून विकासकामे करून मतदारांना आकर्षित करण्याची व्यूहरचना नगरसेवकांनी रचली होती. करोनाकाळातही नगरसेवकांनी प्रभागातील झोपडपट्टय़ांमधील पायवाटा, शौचालये, पदपथ, रस्त्यांची दुरुस्ती, उद्याने, वाहतूक बेटे आदींच्या सुशोभीकरणांच्या कामांचे प्रस्ताव विभाग कार्यालयांना सादर केले होते. या कामांसाठी विभाग कार्यालयांनी ई-निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना कामेही देण्यात आली होती. काही ठिकाणी कामगार उपलब्ध नसल्याने कामे संथगतीने सुरू होती. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी कामे पूर्ण करून नोव्हेंबर, डिसेंबरपासून उद्घाटनांचा धडाका उडविण्याचा नगरसेवकांचा मानस होता.

निवडणूक लांबणीवर पडली तर आता विकासकामांची उद्घाटने करून त्याचा निवडणुकीच्या वेळी उपयोग होणार नाही. त्यामुळे तूर्तास उद्घाटन सोहळे थांबवायचे की उरकायचे अशा संभ्रमात नगरसेवक आहेत. काही नगरसेवकांनी अंदाज घेऊन प्रभागांमधील कामांचे उद्घाटन सोहळे उरकण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader