महापालिकेचे हजारो कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त महापालिका मुख्यालयात येणारे अभ्यागत, पत्रकार व अन्य मंडळी मुख्यालयातील कँटिनमध्ये क्षुधाशांती करतात. तेथीलच पाणीही पितात. पण ते अन्न आणि तेच पाणी आपल्या नगरसेवकांना मात्र नकोसे झाले आहे. स्थायी समितीच्या बैठकीसाठी आजवर या कँटिनमधून येणारा नाश्ता आणि तेथील पाण्याऐवजी बाहेरील नाश्ता आणि बाटलीबंद पाणी दिले जावे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयुक्तांकडे केली असून आयुक्तांनी ती लगोलग मान्यही केली आहे.
संपूर्ण आशिया खंडात शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी प्रसिद्ध असलेल्या महापालिकेच्याच पाण्यावर अविश्वास दाखवून बाटलीबंद पाण्याला पसंती देणारे राहुल शेवाळे स्वत: अभियंता आहेत. स्थायी समितीच्या बैठकांना कँटिनमधून येणारा नाश्ता योग्य दर्जाचा नसल्याने खासगी कंत्राटदारांकडून नाश्ता मागविण्याची परवानगी  शेवाळे यांनी आयुक्तांकडे मागितली होती. पालिकेचे पाणी ग्लासमधून दिले जाते. परंतु बैठक सुरू असताना हे ग्लास लवंडतात आणि पाणी साडून जाते, म्हणून बाटलीबंद पाणी हवे, असे अफलातून कारण शेवाळे यांनी पुढे केले आहे. बाटलीबंद पाण्याएवढेच, किंबहुना त्याहीपेक्षा आमचे पाणी शुद्ध असते, असा दावा जलअभियंते छातीठोकपणे करत असताना, प्रतिष्ठेच्या फाजील कल्पना आणि क्षुल्लक कारणे देत बाटलीबंद पाण्याचा आग्रह धरणाऱ्या नगरसेवकांमुळे पालिकेच्या पाण्याच्या दर्जावर आणि अधिकाऱ्यांच्या मेहनतीवरही बोळा फिरवला जात आहे, अशी खंत पाणीपुरवठा खात्यातील कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
कँटिनऐवजी बाहेरून नाश्ता मागविल्यास त्यावर माणशी १०० रुपये खर्च होणार आहे. तसेच बैठक दुपारी असल्यास जेवणावर माणशी २०० रुपये खर्च होणार आहे. बाटलीबंद पाण्याचा खर्च वेगळा. हा सगळा खर्च अर्थातच जनतेच्याच पैशातून होणार आहे.
वास्तविक, कँटिनमध्ये मराठी पद्धतीचे अनेक चांगले खाद्यपदार्थ मिळतात.हजारोजण येथे रोज न्याहारी करतात. मग नगरसेवक स्वत:ला कोण समजतात, अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये उमटू लागली आहे.

नगरसेवक की नगरभक्षक?
विद्यमान नगरसेवकांनी नवीन कनेक्शनसह अँड्रॉइड फोन व महिना दीड हजार रुपयांपर्यंत बिल मोफत मिळते. लॅपटॉप मिळतो. बेस्टला परवडेनाशा झालेल्या वातानुकूलित बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा नगरसेवकांना हवी आहे. जनतेच्या पैशावर आपला जीवनविमा उतरविला जावा, अशीही मागणी नगरसेवकांनी केली आहे. अशा नगरसेवकांना ‘नगरसेवक’ म्हणायचे की ‘नगरभक्षक’?

Story img Loader