पालिकेच्या खर्चात दौऱ्याचे आयोजन करण्याची मागणी

मुंबईतील क्षयरोग रुग्णालयाकडे अभावानेच फिरकणाऱ्या आरोग्य समितीमधील नगरसेवकांना नैनितालमधील टी. बी. सॅनिटोरियम रुग्णालयाला भेट देण्याची, तर चेरापुंजीमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्याने स्थापत्य समितीला (शहरे) मेघालयातील रस्त्यांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली आहे. त्यामुळे या दोन्ही समित्यांमधील नगरसेवकांनी अनुक्रमे दिल्ली-नैनिताल आणि मेघालय येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. त्याचा खर्च पालिकेच्या तिजोरीत करदात्यांच्या पैशांतून केला जावा, अशी नगरसेवकांची इच्छा आहे.

नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (एआयआयएमएस) हे मोठे रुग्णालय असून तिथे रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा देण्यात येते. तसेच नैनितालमधील भोवाली येथील टी. बी. सॅनिटोरियम रुग्णालयामध्ये क्षयग्रस्त रुग्णांवर उत्तम उपचार केले जातात. या दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्णांवर करण्यात येणारे उपचार आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यासाठी आरोग्य समिती सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन दिल्ली आणि नैनिताल येथे करावे, अशी मागणी समितीमधील नगरसेवकांनी एकमताने केली आहे. दिल्ली व नैनितालच्या रुग्णालयांमधील चांगल्या वैद्यकीय सेवा-सुविधा पालिकेच्या रुग्णालयांत दिल्यास मुंबईतील गरीब रुग्णांना फायदा होईल. त्यामुळे या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करावे, असा आग्रह धरत आरोग्य समितीने आपला प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यासाठी महापौरांकडे पाठविला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर सखल भागांत पाणी साचते. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा होते. मेघालयातील चेरापुंजी येथे सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र या शहरातील रस्ते सुस्थितीत आहेत. त्यामुळे तेथील पर्जन्यजल वाहिन्यांची बांधणी करताना वापरलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी शिलाँग-मेघालय येथे अभ्यास दौरा आयोजित करण्याची इच्छा स्थापत्य समिती (शहर) मधील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. तसा प्रस्ताव समिती सदस्यांनी एकमताने मंजूर केला आहे.

दोन्ही समित्यांच्या अध्यक्षांनी याबाबतचे पत्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठविले आहे. पालिकेच्या तिजोरीत करदात्यांनी कररूपात जमा केलेल्या पैशांतूनच या दौऱ्यांचा खर्च करावा, असेही या सदस्यांचे म्हणणे आहे.

दौऱ्याआधी टीका

दिल्ली-नैनितालला जाण्यास उत्सुक असलेल्या आरोग्य समितीमधील किती सदस्यांनी परळ येथील क्षयरोग रुग्णालयाला भेट दिली आहे, क्षयरोग रुग्णांची संख्या किती, त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात, त्यांच्या पोषण आहार योजनेबाबत सदस्यांनी किती वेळा आढावा घेतला, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर पावसाळ्यात पाणी साचून खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी स्थापत्य समिती (शहर)मधील किती सदस्यांनी प्रयत्न केले, अशी विचारणाही होऊ लागली आहे. गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच या अभ्यास दौऱ्यांबाबत टीका सुरू झाल्यामुळे त्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Story img Loader