नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाल्यामुळे आता राजकीय नेते मंडळींनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर चिखलफेक सुरू केली आहे. वाहन, वजनकाटा आदींच्या नोंदवह्य़ांमध्ये अनियमितता आढळल्याने आणि एकच वाहन अनेक कंत्राटात २० मिनिटांच्या फरकाने कार्यरत असल्याचे नोंदीवरून उघड झाले आहे. काही वाहने आठ-आठ तास कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण क्षेपणभूमीत नेमका किती गाळ टाकला गेला याचा थांगपत्ता चौकशी समितीला लागलेला नाही. त्यामुळे गेला गाळ कुणीकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, चौकशीतील काही त्रुटींमुळे ही समितीही संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई महापालिकेने छोटे-मोठे नाले आणि मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी ५४ कंत्राटदारांना दोन वर्षांसाठी सुमारे २८२.२ कोटी रुपयांची कंत्राटे दिली आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी झालेल्या नालेसफाईच्या कामात मोठा घोळ आढळून आला असून नदी-नाल्यातून उपसलेला गाळ नेमका टाकला कुठे हा कळीचा मुद्दा आहे. गाळ वाहून नेण्यासाठी एकच वाहन अनेक कंत्राटांमध्ये काही मिनिटांच्या अंतराने वापरल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत. एकूणच वाहन नोंदींबाबत घोळ असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहेत. तसेच वाहन ट्रॅकिंग यंत्रणेतील दोष पुढे आले आहेत. नदी-नाल्यातून नेमका किती गाळ काढला, किती गाळ क्षेपणभूमीत टाकला, की गाळ न उपसताच या सर्व नोंदी करण्यात आल्या असे अनेक प्रश्न गुलदस्त्यात आहेत. मात्र नऊ कंत्राटदारांच्या कामामध्ये अनियमितता आढळल्याने आता ५४ कंत्राटदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीमुळे कंत्राटदार आणि अधिकारी धास्तावले आहेत. नऊ कंत्राटांची चौकशी करणाऱ्या सदस्यांनी काही क्षेपणभूमींना भेट दिल्याचा उल्लेख अहवालात केला आहे. मात्र क्षेपणभूमींची नावे त्यात नमूद केलेली नाहीत. क्षेपणभूमीला भेट देतानाच समितीने संबंधित ग्रामपंचायत आणि जमीन मालकाची भेट का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही समितीही संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा