भ्रष्टाचार रोखण्यासाठी केरोसीनचे अनुदान पात्र शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, अमरावती, नाशिक, वर्धा, पुणे, नंदूरबार जिल्ह्य़ांमध्ये ती राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केरोसीनचा काळाबाजार थांबविण्यासाठीचे अनेक उपाय फोल ठरल्याने आता हे अनुदान थेट लाभार्थीपर्यंत रोखीने व बँक खात्यात जमा केल्याने भ्रष्टाचार थांबेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या योजनेनुसार शिधावाटप दुकानांमधून खुल्याबाजाराप्रमाणे केरोसीन उपलब्ध होईल आणि छाननीनंतर अनुदानाची रक्कम पात्र कार्डधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्य़ात ही योजना राबविली जाणार असून केंद्र शासन देशभरात ती राबविणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. कार्डधारकांच्या पती-पत्नीचे संयुक्त बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जर कुटुंबातील महिलेचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्यास नवीन खाते उघडण्याची गरज नाही. पण कुटुंबप्रमुख पुरूषाचे बँक खाते असल्यास पत्नीसह संयुक्त खाते उघडावे लागेल. तो विधुर असल्यास कुटुंबातील ज्येष्ठ महिलेच्या नावासह संयुक्त खाते उघडावे लागेल. बँक खाते उघडण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा