लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील बहुचर्चित असा निसर्ग उन्नत मार्ग (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) आकर्षणाचा विषय बनल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आपलीच पाठ थोपटून घेतली असली तरी या प्रकल्पाचा कालावधी वाढल्यामुळे खर्च दुपटीने वाढला आहे. मूळ प्रकल्पाचा खर्च १२ कोटींवरून २५ कोटी झाला आहे. तसेच या मार्गाच्या देखभालीसाठी आणखी दोन कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे.
मुंबईच्या एका टोकाला असलेला मलबार हिल हा परिसर घनदाट झाडांसाठी व निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील हॅंगिंग गार्डन, म्हातारीचा बूट ही खास आकर्षणाची केंद्रे आहेत. या आकर्षण केंद्रात आता आणखी एक भर पडली आहे. मुंबई महानगरपालिकेने या परिसरात ‘निसर्ग उन्नत मार्ग’ (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) तयार केला आहे. सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. गुढीपाडव्यापासून हा उन्नत मार्ग सुरू झाला असून पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद या प्रकल्पाला मिळत आहे. मात्र या प्रकल्पाचा खर्च गेल्या दोन वर्षात वाढल्याचेही आढळून आले आहे.
मलबार हिल टेकडी येथील कमला नेहरू उद्यान व फिरोजशहा उद्यानाजवळ निसर्ग उन्नत मार्ग तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेने २०२१ पासून प्रयत्न सुरू केले आहेत. मलबार टेकडीच्या उतारावर असलेल्या जंगलाचे तसेच त्यामध्ये विहार करणाऱ्या पशु-पक्षी व वन्य जीवांचे दर्शन आणि त्यांचे आवाज ऐकत टेकडी चढता यावे याकरीता हा उन्नत मार्ग बांधण्याचे ठरवले होते. कोणत्याही प्रकारे वृक्षहानी व वन्यजीवांची हानी होऊ न देता या भूभागातून फेरफटका मागण्याकरीता पर्यटकांना या उन्नत मार्गाने जाता येईल, असा प्रशासनाचा प्रयत्न होता.
खर्च किती वाढला
या मार्गाकरीता प्रशासनाने नेमलेल्या वास्तुविशारद व संरचनात्मक सलागारांनी सादर केलेली संकल्प चित्रे व आराखड्यानुसार या कामासाठी १२ कोटी ६६ लाखांचा अंदाजित खर्च अपेक्षित होता. या कामाकरीता पुढे आलेल्या निविदाकाराने अंदाजित रकमेपेक्षा सुमारे ४० टक्के जादा दर लावले होते. त्यामुळे या उन्नत मार्गाचा खर्च १२ कोटींवरून सर्व करांसह २२ कोटींवर गेला होता. मात्र प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च २२ कोटींवर २५ कोटींवर गेला आहे. हा प्रकल्प २०२३ च्या सुरूवातीलाच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाला दोन वर्षे विलंब झाला.
खर्च का वाढला
कमला नेहरू उद्यानालगतच्या उतारावर हा मार्ग तयार करायचा होता. सर्व बांधकाम साहित्याची ने – आण करणे, कामाकरीता आवश्यक त्या साधन सामुग्रीची ने – आण करणे याकरीता जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून हे काम करावे लागले. हे कामाचे स्थळ शांतता क्षेत्रात असून त्याचे काम दिवसांतील मर्यादित वेळेतच करावे लागत होते. या कामासाठी ३०० चौरस मीटर इतक्या मोठ्या प्रमाणात सागाचे लाकूड लागले. तसेच हे लाकू़ड फॅक्टरीतून कापून आणावे लागले. या सर्व प्रक्रियेस जास्त पैसे देऊन कुशल कामगार उपलब्ध करावे लागले. हे काम करताना माती ढासळून जीवित व वित्त हानी होणार नाही याकरीता उपाययोजना कराव्या लागणार आहेत. या कारणांमुळे आधीच हा खर्च वाढला होता. त्यात विलंबामुळे खर्च आणखी वाढला.
देखभालीसाठी आणखी खर्च
या उन्नत मार्गाच्या प्रचालन, स्वच्छता व सुरक्षिततेसाठी आता पालिका प्रशासन दोन वर्षांसाठी कंत्राट देणार आहे. या कामासाठी पालिका आणखी १ कोटी ३६ लाख रुपये खर्च करणार आहे.