मुंबई : अतिवृष्टी, चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये झालेले नुकसान, परतीच्या आणि बिगर मोसमी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात झालेले नुकसान आणि आता ईशान्य मोसमी पावसामुळे दक्षिण कर्नाटकात होत असलेल्या नुकसानीमुळे देशाच्या कापूस उत्पादनात यंदा सुमारे ७.२७ टक्क्यांनी घट होऊन, ३१७.९५ लाख गाठी (एक गाठ – १७० किलो) कापूस उत्पादन होईल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला आहे.
कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात कापूस लागवडी खालील क्षेत्रात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. देशात कापसाचे सरासरी क्षेत्र १२९.३४ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी १२३.७१ लाख हेक्टरवर लागवड झाली होती, यंदा ११२.७६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
एकीकडे लागवडी खालील क्षेत्रात घट झालेली असतानाच कापूस पिकाला अति पावसाचा फटका बसला आहे. गुजरातमधील सौराष्ट्र जिल्ह्यात कापूस उत्पादन जास्त होते. शंकर – सहा, या लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन फक्त सौराष्ट्रातच होते. ऑगस्टअखेरीस आलेल्या आसना चक्रीवादळाने सौराष्ट्रला मोठा तडाखा बसला. त्यात सौराष्ट्रामधील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस पिकाला पावसाळ्यातील अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि बिगर मोसमी पावसाचा फटका बसला आहे. आता दक्षिणेत ईशान्य मोसमी वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, बागलकोट परिसरातील कापूस पीक धोक्यात आले आहे. वेचणीला आलेल्या कापसाचा लगदा होत आहे. काढलेल्या कापसात ओलावा जास्त राहिल्यामुळे कापूस कुजत आहे. बुरशी लागून काळा पडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी आणि जिनिंग- प्रेसिंग मिलही अडचणीत आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.
हेही वाचा >>>दसरा -दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईतील घरविक्रीत वाढ; महिन्याभरात १२ हजारांहून अधिक घरांची विक्री
एकूणच घटलेली लागवड आणि काढणीच्या वेळी सुरू असलेल्या पावसामुळे देशाच्या एकूण कापूस उत्पादनात सात टक्क्यांनी घट होऊन ३१७.९५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी देशात ३२५ गाठींचे उत्पादन झाले होते.
गुजरातमध्ये मोठी घट शक्य
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा गुजरात मधील कापूस उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये ९० लाख ५० हजार गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ८० लाख गाठींपर्यंत उत्पादन खाली येण्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाना, राजस्थानमधील उत्पादनात ९ लाख ६२ हजार गाठींची घट होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही उत्पादन काहीसे कमी होईल. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशातील उत्पादनातही घटीचा अंदाज सीएआयने व्यक्त केला.
राज्यनिहाय संभाव्य कापूस उत्पादन
(लाख गाठी. स्त्रोत सीएआय)
उत्तर विभाग – पंजाब, हरियाना, राजस्थान – ४६.२६
मध्य विभाग – गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश – १८५.११
दक्षिण विभाग – तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू – ७९.४०
ओडिशासह उर्वरित राज्यांत – ७.१८
यंदा देशातील संभाव्य कापूस उत्पादन – ३१७.९५
गेल्या वर्षीचे कापूस उत्पादन – ३२५.२२