दहावीनंतर व्यवसाय निवडीच्या वाटा विद्यार्थ्यांसमोर निर्णायक टप्प्यावर ठेवल्यास त्यांना त्यांच्या भविष्याचा वेध अचूक घेता येईल. या उद्देशाने उत्तर विभागातील ३९२ शाळांमध्ये प्रत्येकी एक समुपदेशक घडविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची माहिती व्हावी यासाठी शिक्षण निरीक्षक, उत्तर विभागाने ‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना’अंतर्गत भांडूप येथील आय.डी.यू.बी.एस. हायस्कूलमध्ये २५ ते २९ मार्च या कालावधीत ‘समुपदेशक प्रशिक्षण व वेध भविष्याचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

राज्यामध्ये दरवर्षी सुमारे १७ लाख विद्यार्थी शालान्त परीक्षा उत्तीर्ण होतात. यापकी केवळ एक टक्काच विद्यार्थी भविष्याच्या वाटचालीसाठी करिअरच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडण्यासाठी विविध समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांकडे जातात आणि अभ्यासक्रम निवडतात. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने; तर कधी पाल्याच्या कुवतीचा, आवडीचा विचार न करता पालक चुकीचा अभ्यासक्रम निवडतात. यामुळे अनेकदा त्यांचे नुकसान होताना दिसते. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले.
या सोबतच उत्तर विभागातील ३९२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअर जत्रेचे आयोजन केले असून विविध नामांकित शिक्षण संस्था विविध अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यक, फाईन आर्ट, कृषी, संशोधन, अ‍ॅनिमेशन, स्पर्धा परीक्षा यासह अनेक अभ्यासक्रमांची माहिती या करिअर जत्रेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच नामांकित संस्थांचे मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे, अशी माहितीही साबळे यांनी दिली.