मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साद घालताच १५ ऑगस्ट रोजी देशभरात घरोघरी राष्ट्रध्वज फटकवून भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवावरही देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे प्रतिबिंब उमटले आहे. अनेक मंडळांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित देखावे साकारण्यात आले असून देशाला मिळालेले स्वातंत्र्य, स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे महत्त्व, युवा पिढी आदींवर देखाव्यांच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
हेही वाचा >>> नागपूर : गडकरी, बावनकुळे, पटोले यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना
करोनामुळे निर्माण परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये कडक निर्बंधांमध्ये गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही संधी साधून ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक असे देखावे साकारले आहेत.
पर्यावरण संवर्धन, वाढते सायबर गुन्हे, पूरस्थिती, जागतिक हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम आदी विविध विषयांवर देखावे साकारून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंडळांनी समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना अंतर्मुख केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तीन दिवस साजरा झाला. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मंडळांनी गणेशोत्सवात देखावे साकारले आहेत. दहिसरमधील श्री श्रद्धा मित्र मंडळ आणि विक्रोळीतील बालमित्र कला मंडळ यांचा या विषयावरील देखावा बरेच काही सांगून जातो.
दहिसरच्या श्रीश्रद्धा मित्र मंडळाने ‘मी १५ ऑगस्ट बोलतोय’ या संकल्पनेवर देखावा साकारला असून त्याचे लेखन महेश माने यांनी, तर कलादिग्दर्शन भावेश नार्वेकर यांनी केले आहे. दरवर्षी आपण १५ ऑगस्ट साजरा करतो, पण अनेक नागरिक १५ ऑगस्ट रोजी मिळणाऱ्या सुट्टीचे निमित्त साधून बाहेरगावी जातात. स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यांच्या बलिदानाची जाणीव आपल्याला आहे का, आपण देशाभिमान बाळगतो का असे सवाल देखाव्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. याचा विचार प्रत्येकाला करायलाच लागेल, असे मत विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केले.
‘मी भारत बोलतोय’ या संकल्पनेवर विक्रोळीमधील बालमित्र कला मंडळाचा देखावा बेतला आहे. विजय कदम यांनी त्याचे लेखन केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची पिढी आणि आताची पिढी यांची तुलना करीत देखाव्यात युवा पिढीला साद घालण्यात आली आहे. आताच्या युवकांमधील व्यसनाधीनता, उदासीनता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. युवा पिढीकडून देशाच्या कशा अपेक्षा आहेत, हे देखाव्याच्या माध्यमातून कथन करण्यात आले आहे.
कांदिवलीमधील जय महाराष्ट्र सेवा मंडळाने सध्या भेडसवणाऱ्या ‘सायबर गुन्हे’ या विषयावर देखाव्याच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. फसवणूक करण्यासाठी मोबाइलवर येणारे संदेश कसे ओळखायचे, ऑनलाईन आर्थिक घोटाळ्यांना कसे बळी पडू नये, त्याकरीता काय करावे याबाबतची माहिती देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मालाडमधील मालावणी परिसरातील युवक उत्कर्ष मंडळाने पावसाळ्यात येणाऱ्या पूरस्थितीत स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे, कोणती काळजी घ्यायची, बचावकार्य कसे करायचे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाने या देखाव्यात आपत्कालीन व्यवस्थापनावर भर दिला आहे.