लघुसंदेशाची ई-आवृत्ती म्हणून ओळख असलेल्या ट्विटरने सोशल मीडियामध्ये एकच धूम उडवून दिली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिक व्यक्तींपर्यंत बहुतांश लोक आपलं मत व्यक्त करण्यासाठी सध्या ट्विटरची मदत घेत आहेत. या ट्विटरचे उपाध्यक्ष शैलेश राव यांच्याशी बदलता सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा भविष्यातील प्रवास याबाबत केलेली बातचीत..
शैलेश राव ओळख
शैलेश राव हे भारतीय असून त्यांनी गुगलमध्ये आपली कारकीर्द गाजवली. गुगल मॅप, गुगल अर्थ इतकेच नव्हे तर यू-टय़ुबचे कामही त्यांनी पहिले. यानंतर राव यांनी ट्विटरमध्ये आपली पुढची कारकीर्द सुरू केली आणि तेथेही त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवहाराची धुरा सांभाळली. इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात ते पदवीधर आहेत. त्यांना गुगलचा पुरस्कार आणि इंडियन डिजिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
*भारतात दरवर्षी लाखो माहिती तंत्रज्ञान पदवीधर निर्माण होत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बडय़ा कंपन्यांच्या महत्त्वाच्या पदांवर अनेक भारतीय आहेत. तरीही आज आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केवळ सेवा पुरविणारा देश म्हणूनच आहोत. उत्पादनात आपण मागे आहोत. यात आपली शिक्षणपद्धती कोठे कमी पडते का?
– खरे तर हा प्रश्न मला खूप कठीण वाटतो. पण हे सत्य आहे. कारण आपल्या देशात प्रचंड बुद्धिमत्ता आहे. हे जगालाही मान्य आहे. पण आपण प्रगती करताना कुठेतरी कमी पडत असतो. याचे कारण शोधण्याचा मीही खूप प्रयत्न करत असतो. मला यामध्ये असे वाटते की देशातील तरुणाईपुढे सध्या चांगले आदर्श नाहीत. आपल्या देशात नारायण मूर्ती, नंदन निलेकणी अशा लोकांनी इन्फोसिससारखी कंपनी स्थापून तरुणाईला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची दिशा दाखवली. पण तरुणाईने त्याकडे केवळ एक नोकरी म्हणून पहिले. यातून पुढे येऊन त्यांनी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली नाही. यासाठी कुणी तरी प्रवृत्त करावे लागते. हे आपल्याकडे कमी प्रमाणात होताना दिसते. पण आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे आणि आपल्या देशातील तरुण स्वत:ची कंपनी स्थापन करू लागला आहे. यात सेवा तर आहेच पण त्याचबरोबर भारतीय बनावटीची उत्पादनेही बाजारात येऊ लागली आहेत. जर तरुणांनी असे काही आदर्श डोळ्यांसमोर ठेवले तर नक्कीच भारतीय तरुण मोठी भरारी घेऊ शकेल. याचबरोबर तरुणांना इनोव्हेशनसाठी अधिकाधिक पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
*माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या गुगलचा खूप मोठा दबदबा आहे. बहुतांश छोटय़ा कंपन्यांना गिळंकृत करण्याचे काम गुगल करत आहे. गुगलची व्यवसायाची ही भूमिका आयटी उद्योगांच्या दृष्टीने घातक आहे की फायदेशीर आहे?
– गुगल ही इंटरनेट क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. छोटय़ा कंपन्यांना विकत घेऊन ती आपल्या कंपनीशी जोडणे ही गुगलची भूमिका तसे पाहायला गेल्यास उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरू शकते. याचे कारण म्हणजे इनोव्हेटर एकत्र येतात आणि स्वत:ची कंपनी स्थापन करतात. पण काही कारणांमुळे ती कंपनी म्हणावी तशी मार्केटमध्ये उभी राहू शकत नाही. अशावेळी त्यांचे इनोव्हेशन वाया जाण्याची शक्यता असते. अशावेळी मोठय़ा कंपनीने त्यांना हात दिला तर त्या कंपनीने केलेले इनोव्हेशन बाजारात टिकू शकते आणि ते लोकांपर्यंत पोहचू शकते. यामुळे गुगलची ही भूमिका एका अर्थाने फायदेशीरच आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
*सर, सध्या सोशल मीडियाचा खूप बोलबाला सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्या भावना व्यक्त करत असते. भविष्यात याचे चित्र आणखी कसे पाहावयास मिळेल?
– सोशल मीडिया म्हटले की ते खूप मोठे होते. यामुळे मी केवळ ट्विटरपुरते बोलू इच्छितो. ट्विटर सध्या अनेक गोष्टींचा साक्षीदार होत आहे. मग ती अंतराळ प्रदक्षिणा असो किंवा जगातील एखाद्या छोटय़ा देशातील एखाद्या गल्लीत घडलेली घटना असो, प्रत्येक गोष्ट ट्विटरवर वाचावयास मिळत आहे. भविष्यात ट्विटरचा वापर आपत्ती व्यवस्थापन म्हणून कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यापूर्वी जपानमध्ये आलेल्या त्सुनामी व नंतरच्या फुकुशिमा प्रकरणात ट्विटरचा वापर आपत्ती व्यवस्थापनासाठी झाला होता. ट्विटरची ही सामाजिक जबाबदारी आणखी व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात आम्ही शिक्षणासाठी ट्विटरचा वापर कसा करता येईल याचाही विचार करत आहोत.
*सोशल मीडियामध्ये सध्या खूप स्पर्धा सुरू आहे. अशावेळी केवळ १४० अक्षरांची मर्यादा ही तुमची अट तुम्हाला जाचक ठरू शकत नाही का?
– ‘१४० अक्षरे’ हे सर्वाना कोडय़ात टाकणारे गणित आहे. पण ऑनलाइन एसएमएस अशी संकल्पना घेऊन सुरू झालेल्या या ट्विटरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसएमएसची मर्यादा ही १६० अक्षरांची असते. आम्ही २० अक्षरे ही नावासाठी ठेवली आहेत. उरलेल्या १४० अक्षरांमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी यामागची धारणा आहे. स्पर्धा तर राहणारच पण यासाठी जी आमची खास ओळख आहे. ती मोडून काढणे शक्य नाही. ट्विटर हे भविष्यात आम्हाला जगातील प्रत्येकापर्यंत पोहचवायचे आहे. १४० शब्दांत कुणीही व्यक्ती आपली भावना व्यक्त करू शकतो म्हणूनही ही मर्यादा आम्हाला फायदेशीर वाटते. ट्विटर सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहचत आहोत. मग ते अगदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा असोत किंवा छोटे उद्योजक असोत, सर्वांपर्यंत पोहोचणे आम्हाला महत्त्वाचे आहे. ओबामा आजही स्वत: ट्विट करत असतात. यामुळे ट्विटर हे एखादी गोष्ट लाखो लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम आहे याबाबत काही वादच नाही. यामुळेच बॉलीवूड स्टार, विवध उद्योजक, विविध देशांचे- पक्षांचे प्रमुख ट्विटरचा वापर करत असतात.
*तुम्ही आता म्हणालात तसे ट्विटरचा वापर विविध स्तरांवरून होत असतो. पण त्यावरून अनेकदा प्रक्षोभक संदेश किंवा व्हिडीओ शेअर केले जातात. यासाठी तुमच्याकडे काही यंत्रणा आहे का?
– यासाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवणे कठीण आहे. ही समस्या सर्वच सोशल मीडियांना भासते. यासाठी प्रत्येक देशाची स्वतंत्र धोरणे उपयोगी पडतात. पण एखाद्या कंपनीला एवढय़ा मोठय़ा स्तरावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते.
*मोफत खाते सुरू करणे, दिवसाला कितीही ट्विट करणे यामागचे कंपनीच्या उत्पनाचा फॉम्र्युला काय?
– बहुतांश कंपन्यांची गणिते ही जाहिरातींवरच अवलंबून असतात तसेच ट्विटरचेही आहे. ट्विटरमध्ये सध्या अनेक जाहिराती ट्विट होत असतात. या ट्विट्सवर कुणी क्लिक केले की त्यातून मिळणारे पसेही वाढत जातात. नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार जाहिरातींवर क्लिक करण्याचे प्रमाण मोठय़ाप्रमाणावर वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
*ट्विटरने नुकताच आपला आयपीओ बाजारात आणला, त्याला कसा प्रतिसाद मिळाला?
– कोणतीही कंपनी पसे उभारण्यासाठी आयपीओ बाजारात आणते तसेच आम्हीही केले आहे. याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
*ट्विटर भारतात आपले कार्यालय उघडण्यासाठी काही प्रयत्न करत आहे का?
– होय, पण इतक्यात नाही. सध्या भारतात आमची छोटी टीम काम करत आहे. भारतात ट्विटरचे वापरकत्रे असले तरी ते आणखी जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. जेव्हा आम्हाला वापरकर्त्यांच्या संख्येवर समाधान होईल त्यावेळेस आम्ही भारतात स्वत:चे कार्यालय सुरू करू. भारत हा कोणत्याही कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळे आम्हीही भारतात आमचे व्यावसायिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्सुक आहोत.
*ट्विटर किंवा सोशल मीडियापुढील आव्हाने काय आहेत?
ट्विटरच्या बाबतीत सांगायचे तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना ही माध्यमे वापरण्यासाठी अधिक जागरूक करणे हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी आम्ही देशात अनेक कंपन्यांशी सहकार्य केले आहे, तसेच यापुढेही सहकार्य वाढत राहील आणि आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू.
देशात आदर्श तयार व्हायला हवेत
लघुसंदेशाची ई-आवृत्ती म्हणून ओळख असलेल्या ट्विटरने सोशल मीडियामध्ये एकच धूम उडवून दिली आहे.

First published on: 06-01-2014 at 01:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Country needs ideals shailesh rao