लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात आहे. अनेक प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देऊ लागले आहेत. प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा एक थांबा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गुजरातमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

देशातील तिसऱ्या क्रमांकाची आणि पश्चिम रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल – गांधीनगरदरम्यान धावते. अत्यंत कमी कालावधीत या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वंदे भारतला पश्चिम रेल्वेवरील गुजरातमधील आनंद स्थानकावर प्रायोगिक तत्वावर नुकताच अतिरिक्त थांबा देण्यात आला. आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकावरील गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्वावर आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसला २३ मार्च २०२५ पासून प्रायोगिक तत्वावर आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे गाडी क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी १०.३८ वाजता आनंद स्थानकात पोहचते. त्यानंतर सकाळी १०.४० वाजता निघते. इतर स्थानकाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस आनंद स्थानकावर दुपारी ३.३० वाजता पोहोचते आणि दुपारी ३.३२ वाजता निघते. अतिरिक्त थांब्यामुळे अहमदाबाद स्थानकावरील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. ही रेल्वेगाडी आता अहमदाबाद स्थानकावर दुपारी २.५० ऐवजी दुपारी २.४५ वाजता पोहचते आणि अहमदाबाद स्थानकावरून दुपारी ३ ऐवजी दुपारी २.५५ वाजता सुटते. तसेच मुंबई सेंट्रल येथे रात्री ८.५५ ऐवजी रात्री ८.३० वाजता पोहोचते.

पश्चिम रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस झटपट हिट

देशातील तिसरी आणि पश्चिम रेल्वेची पहिली मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस ३० सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झाली. ही एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. मुंबई सेंट्रल – गांधीनगरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या एकूण आसन क्षमेतच्या १३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला होता. वंदे भारतला मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर येथे थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई – गांधीनगर वंदे भारत सात जिल्ह्यांला जोडते. आता आनंद रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आल्याने तेथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.