लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : जे. जे. रुग्णालयाची इमारत १८४५ मध्ये उभी राहिली असून, जे.जे. रुग्णालय मे २०२४ मध्ये १८० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने जे. जे. रुग्णालयात भारतातील पहिले वैद्यकीय शिक्षण व संशोधनावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या १८४५ च्या पहिल्या तुकडीमधील विद्यार्थी, तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉ. भाऊ दाजी लाड, संस्कृत विद्वान डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. सखाराम अर्जुन, तसेच ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे डॉ. विठ्ठल शिरोडकर, डॉ. खान अब्दुल जब्बार खान, डॉ. जीवराज मेहता, डॉ. एस. जे. मेहता, डॉ. द्वारकानाथ कोटनीस, डॉ. नोशिर एच. ॲटिया, डॉ. बोमसी वाडिया, डॉ. रुखमाबाई राऊत, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त नामांकित डॉ. फारुख उडवाडिया या सर्वांचा इतिहास, तसेच आधुनिक वैद्यक क्षेत्र अशा असंख्य बाबींचा या संग्रहालयात समावेश असणार आहे.
आणखी वाचा-मुंबई : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या कुटुंबांचे समुपदेशन
जे.जे. रुग्णालयातील विविध विभागांच्या नूतनीकरणासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रणजीत हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भुषण शेगडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पल्लवी सापळे यांनी संग्रहालय उभारण्याबाबत सादरीकरण केले. त्याला बैठकीमध्ये मंजुरी देऊन त्याचे कामकाज सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. हे संग्रहालय १८४५ साली बांधण्यात आलेल्या ग्रॅन्ट शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागतिक वारसा वास्तू असलेल्या इमारतीमध्ये उभारण्यात येत आहे. संग्रहालय तयार झाल्यावर भारतातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास हा विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला पाहता येणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.