मुंबई: कुटुंबियांकडून होणाऱ्या विरोधामुळे एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी विक्रोळी रेल्वे स्थानकात घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. भांडुपच्या हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या नितेश दंडपल्ली (२०) या तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनेक महिन्यांपासून प्रेमसबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबियांना ही बाब समजली. त्यांनी दोघांच्या नात्याला विरोध दर्शवून मुलीला बाहेर जाण्यास विरोध केला होता. तसेच काही दिवसातच ते तिला गावी पाठवणार होते.
हेही वाचा >>> Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
तरुणाला ही बाब समजताच तो शनिवारी मुलीच्या घरी गेला. त्यानंतर रविवारी सकाळी मुलगी घरातून बाहेर पडली. मात्र दुपारपर्यंत तिचा मोबाइल बंद असल्याने कुटुंबीयांनी याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात तिचे अपहरण झाल्याची तक्रार देखील दाखल केली होती. भांडुप पोलीस या मुलीचा शोध घेत असतानाच रविवारी दुपारी दोनच्या सुमारास तरुणाने आणि या मुलीने विक्रोळी रेल्वे स्थानकात गरीब रथ या मेल एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली. कुर्ला लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले आहेत. कुटुंबियांच्या विरोधामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे तपासात समोर आले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.