मुंबईच्या वांद्रे येथील बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात दोघेजण समुद्रात बुडाले. प्राथमिक माहितीनुसार, तरन्नुम, कस्तुरी आणि नाझिया या तीन मैत्रिणी बँडस्टँडवर फिरायला आल्या होत्या. तरूणी याठिकाणी आल्या तेव्हा समुद्रात ओहोटी होती त्यामुळे त्या समुद्रात बऱ्याच खोलवर जाऊन छायाचित्रे काढत होत्या.  दरम्यानच्या काळात भरतीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. मात्र, छायाचित्रे काढण्यात मग्न असलेल्या या तरूणींना त्याचा अंदाज आला नाही. एका बेसावध क्षणी सेल्फी काढत असताना अचानक या मुलींचा पाय घसरला आणि त्या थेट समुद्रात बुडू लागल्या. या तिघीजणी पाण्यात बुडत असताना रमेश नावाच्या एका तरूणाने जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी कस्तुरी आणि नाझिया यांना वाचवले. मात्र, तरन्नुमला वाचवताना रमेशही पाण्यात बुडाला. पोलिसांच्या माहितीनुसार, एका मुलीचा मृत्यू झाला असून रमेश अद्याप बेपत्ता आहे. पोलीस आणि स्थानिकांकडून सध्या रमेशचा शोध सुरु आहे.

Story img Loader