एक होते गाव. दीडशे वर्षांचा इतिहास लाभलेले. कधी काळी गिरणगावची संस्कृती असताना हे गाव गजबजलेले होते. या सुखाने नांदणाऱ्या या गावाला जागतिकीकरणाचा फटका बसला. गिरण्यांवर टाळे लागल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. पुनर्विकासाच्या नावावर मुंबईतील अनेक चाळींचा विकास रखडला. परिणामी, गावाला अवकळा आलेली असताना येथील एका दाम्पत्याने आपल्या गावाचा कायापलट करण्याचा संकल्प सोडला आणि गावाला एक नवे रूप मिळाले. यामध्ये गावातील आबालवृद्धही सामील झाले आणि यातून उभे राहिले ‘नवे सर्जनशील भोईवाडा गाव’.
पडके वाडे आणि मोडकळीस आलेल्या चाळींच्या या गावात आज हिरवेगार गालिचे दृष्टीस पडू लागले आहेत. समता आणि अभिषेक पांचाळ या दाम्पत्याने साडेतीनशे कुटुंबांच्या वस्तीमध्ये सुमारे अडीच हजार झाडे लावली. त्यांनी साधारण वीस हजार प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांचा उपयोग करीत कलात्मक पद्धतीने या रोपटय़ांची आणि कलाकृतींची रचना केली आहे. जग बदलायचे असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी या वचनावर खरे उतरत निसर्ग केंद्रस्थानी ठेवून या वस्तीची रंगरंगोटी करण्यात आल्याचे समता पांचाळ यांनी सांगितले. मात्र या वेळी निसर्गाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या पक्षांसाठी वस्तीतील प्रत्येक झाडांवर ‘बर्ड फिडर’ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रहिवाशांबरोबच पक्षीदेखील आनंदाने या वस्तीत नांदत आहे.
गाडय़ांच्या टायरचा वापर अतिशय कलात्मक पद्धतीने करीत यापासून बसण्यासाठी खुर्ची, टेबल, मुलांना खेळण्यासाठी सी-सॉ तयार करण्यात आले. या वस्तीत पूर्वी मुलांना खेळण्यासाठी मैदान होते. मात्र विकासाच्या नावाखाली या मैदानाचीदेखील दूरवस्था झाली आहे. मात्र वस्तीतील कायापालटामध्ये येथील सर्वच बच्चेकंपनी सामील झाली. एरवी मोबाइल आणि दूरचित्रवाणीवर दंग झालेली मुले भिंती रंगविण्यापासून ते वस्तू तयार करण्यापर्यंत सर्वच कामांत मदत करीत होते. यानिमित्ताने वस्तीतील कित्येक मुलांमध्ये कलात्मक गुण असल्याचे नव्याने कळल्याचे पांचाळ दाम्पत्य सांगत होते.
कला ही समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे. त्यामुळे या वस्तीमध्ये रंगरंगोटीबरोबरच टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळे कलाविष्कार ही बनविण्यात आले होते. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांपासून ‘मुलगी वाचवा’ हा संदेश देणारी कलाकृती साकार करण्यात आली आहे. वारली चित्राच्या आधारे आपल्या संस्कृतीची ओळख आताच्या पिढीला करून देण्याचा उद्देश असल्याचे अभिषेक पांचाळ यांनी सांगितले.
पांचाळ दाम्पत्याने आपल्या कलेच्या जोरावर मराठी, ख्रिस्ती आणि गुजराती बांधवांच्या वस्तीला नवी ओळख मिळवून दिली आहे. या वस्तीतील घरांच्या भिंतीवर संदेश लिहिला आहे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविण्यात आल्या आहेत.
तर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये लावलेल्या झाडांपासून मगरीची कलाकृती, वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट, तुळशीची रोपटीही लावण्यात आली आहे. तर एके ठिकाणी भांडय़ांचा वापर करीत दुर्गेचे रूप साकारण्यात आले आहे. विकास म्हणजे चकाचक रस्ते, गगनचुंबी इमारती, उंची कपडे नसून विकास सामान्य नागरिकाने पर्यावरणाच्या सोबतीने आपला आणि आपल्या समाजातील लोकांना स्वच्छतेचा, निसर्ग वाचविण्याचा संदेश पोहोचविणे आणि सरकारला दोष न देता स्वबळावर बदल घडवून आणणे हादेखील स्वत:चा विकास आहे जो या पांचाळ दाम्पत्याने घडवून आणला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा