लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : अंमली पदार्थांच्या व्यसनासाठी पैसे मिळावे म्हणून पोटच्या दोन मुलांना अंधेरीतील दाम्पत्याने विकल्याची गंभीर घटना उघडकीस आली. मुलांच्या आत्याला हा प्रकार कळल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी अंधेरीतील डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी दाम्पत्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी दाम्पत्याने दोन वर्षांचा मुलगा ६० हजार रुपयांना, तर एक महिन्याची मुलगी १४ हजार रुपयांना विकल्याचा आरोप आहे. यामागे लहान मुलांची विक्री करणारी मोठी टोळी असल्याचा संशय असून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिसांनी शब्बीर खान, त्याची पत्नी सानिया, उषा राठोड आणि शकील मकरानी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. शब्बीर आणि सानिया यांना अंमली पदार्थांचे व्यसन होते. अंमली पदार्थ सेवनाशिवाय ते राहू शकत नव्हते. त्याचवेळी आरोपी महिला राठोड त्यांच्या संपर्कात आली. तिने खान दाम्पत्याला प्रथम मुलगा विकण्यासाठी तयार केले. त्यांना दोन वर्षांचा मुलगा हुसेन आणि एक महिना २२ दिवसांची मुलगी आहे. शब्बीर आणि सानिया यांनी मे २०२२ मध्ये हुसैनला ६० हजार रुपयांमध्ये एका व्यक्तीला विकले. त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच या जोडप्याला नुकतीच एक मुलगी झाली होती. हुसेननंतर त्यांनी गेल्या महिन्यात मुलीलाही आरोपी शकील मकरानी यांना १४ हजार रुपयांमध्ये विकले.
आणखी वाचा-मुंबईत पावसाची शक्यता
शब्बीरची बहीण रुबिना खान हिला याची माहिती मिळाली आणि तिला धक्का बसला. तिने आपल्या भावावर राग व्यक्त केला व तातडीने अंधेरी येथील डी.एन. नगर पोलीस ठाण्यात भाऊ व वहिनीविरोधात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल केला.
रुबिनाच्या तक्रारीच्या आधारे डी. एन. नगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७०(४), ३७०(५), ३४ आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ च्या कलम ८१ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते गुन्हे शाखेच्या कक्ष ९ कडे वर्ग करण्यात आले.