नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे चुलत बंधु व महापालिकेतील पक्षाचे नगरसेवक देविदास चौगुले यांच्या हत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी पाच आरोपींना निर्दोष सुटका केली. या निकालामुळे रबाळे पोलिसांच्या तपासाविषयी आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
पाच वर्षांपूर्वी देविदास यांची ऐरोली येथील साईनाथवाडी परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गँगस्टर रवि पुजारीचा हात असल्याचा आरोपही करण्यात आले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी विजय चौगुले यांना धमकीचे दूरध्वनीही आले आहेत. तशा स्वरूपाची तक्रारही रबाळे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पाच आरोपींच्या निर्दोष सुटकेमुळे खळबळ उडाली आहे.
न्यायालयीन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक पाटील, इकलाख शेख, साजिद जुबेर बंगाली, रविंद्र घारे, शिवकुमार सिंग, या पाचजणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या पैकी दिपक पाटील याची २०११ मध्ये विटावा परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ८ नोव्हेंबर २००७ मध्ये नगरसेवक देवीदास चौगुले यांची ऐरोली येथील साईनाथवाडीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी दिपक पाटील, इकलाख शेख, साजिद जुबेर बंगाली, रविद्र घारे, शिवकुमार सिंग या पाच जणांना अटक केली होती. त्यापैकी दिपक आणि शिवकुमार यांची जामिनावर सुटका झाली होती. तर उर्वरित तिघे कारागृहामध्येच होते. जामीनावर बाहेर असताना दिपकची हत्या झाली होती. देवीदास चौगुले हत्येप्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवासे यांच्यासमोर झाली. त्यावेळी सबळ पुराव्या अभावी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी वकील म्हणून संजय लोंढे यांनी काम पाहिले.
दरम्यान, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी सांगितले. तसेच या प्रकरणामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गँगस्टर रवी पुजारी टोळीकडून धमकीचे दुरध्वनी येत आहेत. यासंबंधी रबाळे पोलिसांना माहिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा