पानसरे हत्या प्रकरणात न्यायालयाचा सवाल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात रुद्र पाटील हा मुख्य संशयित असल्याबाबत आणि या हत्याप्रकरणी अटक झालेल्या समीर गायकवाडची त्याच्याशी घनिष्ठ मैत्री असल्याबाबत आणि रुद्रच्या पत्नीनेच समीरसाठी वकीलपत्र दाखल केल्याबाबत तपास अहवालात मौन का, असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारी वकिलांना केला आणि तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. रुद्र पाटीलच्या अटकेसाठी कोणते प्रयत्न केले, याबाबत आठवडाभरात खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
रुद्र हा गोवा बॉम्बस्फोटातही मुख्य आरोपी असून गेल्या सहा वर्षांपासून तो फरारी आहे. पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांला अटक झाली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला, तर पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाला (एसआयटी) आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्या. रणजित मोरे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने दोन्ही यंत्रणांनी आतापर्यंतच्या तपासाचा मोहोरबंद अहवाल न्यायालयात सादर केला. समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती सरकारच्या वतीने अ‍ॅड्. मनकुँवर देशमुख यांनी दिली. मात्र तपास म्हणावा तसा केला जात नसल्याचा आरोप पानसरे कुटुंबीयांच्या वतीने अ‍ॅड्. अभय नेवगी यांनी केला.

वरिष्ठ वकील नेमा!
गायकवाडला महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता तेथे सरकारी वकिलांना पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी योग्य युक्तिवाद करता आला नाही. त्यामुळे खुद्द तपास अधिकाऱ्यालाच युक्तिवाद करावा लागल्याची बाब नेवगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणांमध्ये सरकारने एखाद्या वरिष्ठ वकिलांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court ask about co pansares murder case progress