शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिलीय. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे. सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात कोरोनाशी संबंधित शारीरिक अंतराचं पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

विशेष म्हणजे आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन सरकारी वकील आणि अॅड. अमित देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं दिसलं. देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली. यानंतरही सेठना यांनी गुरुवारचा आग्रह केल्यानंतर देसाई यांनी त्यांना न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, असं म्हणत टोला लगावला.

दरम्यान, याआधी आर्यन खानच्या जामिनावर मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर याचिका आली होती. तेव्हा न्यायालयाने जामिनावर सुनावणीचा अधिकार विशेष सत्र न्यायालयाला असल्याचं सांगत ही याचिका फेटाळली होती.

आर्यन खानसह ७ जणांना सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.

हेही वाचा : “अदानी बंदरातील ३ हजार किलो ड्रग आणि भाजप…”, विशाल दादलानीचे आर्यन खान प्रकरणातील ट्वीट चर्चेत

नेमकं प्रकरण काय?

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती. माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.