एसटी बसखाली चिरडून ठार झालेल्या पादचाऱ्याच्या मृत्यूस एसटी महामंडळाला जबाबदार ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने या पादचाऱ्याच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
आपला चालक निष्काळजीपणे बस चालवित नव्हता, हे सिद्ध करण्यात एसटी महामंडळाला अपयश आल्याचा निष्कर्ष नोंदवत न्यायमूर्ती ए. एच. जोशी यांनी महामंडळाला संबंधित पादचाऱ्याच्या कुटुंबियास नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. महामंडळाने आपला दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात त्यांना त्यात अपयश आले. त्यांचा हा दावा काल्पनिक आणि अस्वीकारार्ह असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्यांनाच जबाबदार ठरविले.
डिसेंबर २०१२ मध्ये मोटार वाहन अपघात लवादाने एसटी महामंडळाला अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. विक्रीकर विभागाचा कर्मचारी असलेल्या प्रदीप साहा यांच्या अपघाती मृत्यूस एसटी महामंडळाच्या चालकास जबाबदार ठरवले होते. त्यामुळे त्या निर्णयाविरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  
५ जून २००३ रोजी एसटी बसचा चालक बालाजी गुंदरे याने नांदेड ते सोलापूर या प्रवासादरम्यान बेदरकारपणे बस चालवून साहा आणि त्याच्या आईवडिलांना धडक दिली होती. या अपघातात साहाचा मृत्यू झाला होता. प्रदीप हा कुटुंबातील एकमेव कमावता होता, असा दावा करीत त्याच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाईसाठी मोटार वाहन अपघात लवादाकडे धाव घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा