सलमान खानविरुद्ध बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीस असे वृत्त प्रसिद्ध करण्यास गुरुवारी मज्जाव केला.
‘हिट-अ‍ॅण्ड-रन’ खटल्याची सुनावणी लांबविण्यासाठी सलमानने पोलिसांना पैसे दिल्याचा आरोप करणारे वृत्त वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते. त्या विरोधात सलमानने उच्च न्यायालयात धाव घेत वृत्तवाहिनीने यासाठी लेखी वा वृत्तवाहिनीवरून माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच अशा बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध न करण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्यासमोर सलमानच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने प्रथमदर्शनी तरी वृत्तवाहिनीने सलमानची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचे मत नोंदवले. तसेच त्याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या सुनावणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करीत सलमानला दिलासा दिला.

Story img Loader