ताज हॉटेलमध्ये एका अनिवासी भारतीयाला केलेल्या मारहाणप्रकरणी अभिनेता सैफ अली खान गुरुवारी मुंबईतील न्यायालयात उपस्थित राहिला. सुनावणीला हजर राहण्याचे वारंवार आदेश देऊनही सैफ हजर राहत नसल्याने त्याच्या नावे वॉरंट बजावण्यात यावे, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची दखल घेत सैफला पुढील सुनावणीच्या वेळेस हजर राहण्यास बजावले होते. त्या पार्श्वभूमीवर सैफ गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहिला. दरम्यान, या प्रकरणी सामंजस्याने मार्ग काढण्याची तयारी सैफने दर्शविल्यानंतर न्यायालयाने हा खटला समुपदेशकाकडे पाठविला.
२२ फेब्रुवारी २०१२ रोजी सैफ कुटुंबीय व मित्रांसोबत हॉटेल ताजमहल येथे गेला होता. त्या वेळेस शेजारीच आपल्या कुटुंबीयांसोबत बसलेल्या अनिवासी भारतीयासोबत त्याची आधी शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर त्याचे रूपांतर या अनिवासी भारतीयाला मारहाण करण्यात झाले. त्यानंतर सैफविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी सैफवर सध्या मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला सुरू आहे. परदेशी वास्तव्यास असूनही तक्रारदार सुनावणीस हजर राहतात, परंतु भारतात असून आणि वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊनही सैफ हजर होत नाही. त्यामुळे त्याच्या नावे वॉरंट बजावण्याची मागणी करणारा अर्ज सरकारी पक्षाने केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court refers the 2012 hotel brawl case involving actor saif ali khan for mediation