मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात २०१८ मध्ये केलेली लैंगिक छळवणूकप्रकरणी केलेली तक्रार महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळली. न्यायालयाने तनुश्रीने केलेल्या आरोपांची दखल घेण्यास नकार देताना तिने २००८ मध्ये घडलेल्या घटनेची २०१८ मध्ये तक्रार दाखल केली. ही तक्रार खूपच विलंबाने दाखल करण्यात आली असून दहा वर्षांच्या या विलंबाचे स्पष्टीकरण दिले नसल्याचे न्यायालयाने आदेशात प्रामुख्याने नमूद केले आहे.

तनुश्रीने केलेल्या तक्रारीत पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासह सिनेदिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समी सिद्दिकी यांच्या नावाचाही समावेश होता. महानगरदंडाधिकारी एन. व्ही. बन्सल यांनी या प्रकरणी निर्णय देताना तनुश्रीच्या तक्रारीच्या आधारे पाटेकर यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, घटनेच्या तीन वर्षांच्या आत तक्रार नोंदवण्यासाठी मर्यादा घालण्यात आली आहे. पुरेशा कारणांशिवाय एवढा प्रदीर्घ विलंब माफ केला गेला तर तो समानतेच्या तत्त्वाच्या आणि कायद्याच्या खऱ्या हेतुच्या विरुद्ध असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे, कथित घटनेच्या तथ्यांचा विचार केलेला नसल्याने ती खोटी किंवा खरी म्हणता येणार नाही, असे देखील न्यायालयाने आदेशात नमूद केले.

प्रकरण काय

साल २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमातील तनुश्रीवर चित्रित केल्या जाणाऱ्या एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान, नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने तक्रारीत केला होता. गाण्याचे चित्रिकरण सुरू असताना पाटेकर मध्येच आले आणि त्यांनी आपल्याला स्पर्श करून गैरवर्तन केले. त्यावेळी, निर्माता, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शकाकडे याबाबत तक्रार केली होती, असा तनुश्रीने आरोप केला होता. तनुश्रीच्या तक्रारीच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी पाटेकर आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आधी म्हणजेच २००८ मध्येच गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परंतु, त्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही, असा दावाही तनुश्रीने केला होता. या आरोपांचे पाटेकर यांनी खंडन केले होते.

याप्रकरणी पोलिसांनी २०१९ मध्ये महानगर दंडाधिकाऱ्यांकडे बी सारांश अहवाल सादर करून प्रकरणाच्या चौकशीत कोणत्याही आरोपीने गुन्हा केल्याचे आढळून आलेले नाही. याउलट, ही तक्रार खोटी असल्याचे आढळून आल्याचे म्हटले होते. या अहवालाला तनुश्रीने निषेध याचिकेद्वारे विरोध केला होता. तसेच, तिच्या तक्रारीची पुढील चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. तथापि, नोंद घेण्याच्या बंधनामुळे पोलिसांच्या अहवालावर कारवाई करता येणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने तो निकाली काढला.