कसाबचे भूत मला त्रास देत असल्याचा दावा करणारा दहशवादी अबू जुंदाल याची कसाबसाठी बांधण्यात आलेल्या अतिसुरक्षित अशा ‘अंडासेल’मधून दुसरीकडे हलविण्याची मागणी सोमवारी विशेष न्यायालयाने फेटाळून लावली.
जुंदालची मानसिक स्थिती ठीक असल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जुंदालची कसाबच्या बराकमधून इतरत्र हलविण्याची मागणी फेटाळून लावली. आपल्याला कसाबच्या ‘अंडासेल’मध्ये ठेवण्यात आल्याने दररोज रात्री त्याचे भूत आपल्याला तिथे दिसते. आपल्याप्रमाणेच तुलाही फासावर चढविले जाईल, असे ते आपल्याला सांगते. त्यामुळे आपल्याला कसाबच्या ‘अंडासेल’मधून हलविण्याचे आदेश देण्याची मागणी त्याने एका अर्जाद्वारे विशेष न्यायालयाकडे केली होती. आपल्याला अटक करण्याच्या वेळी आपली मानसिक स्थिती योग्य नव्हती. त्याचमुळे तिहार तुरुंगात आपण ध्यानधारणा करायचो, असेही त्याने अर्जात म्हटले होते. न्यायालयाने त्यानंतर त्याची मानसिक तपासणी करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले होते. सोमवारी तुरुंग प्रशासनाने त्याच्या मानसिक चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर केली. तसेच दररोज त्याला दोन वृत्तपत्रे आणि काही पुस्तके वाचायला दिली जात असल्याचेही न्यायालयाला सांगितले. तुरुंग प्रशासनाने केलेल्या अहवालात जुंदालची मानसिक स्थिती ठीक असल्याचे नमूद करण्यात आल्याने न्यायालयाने जुंदालचा अर्ज फेटाळून लावला.

Story img Loader