मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटींचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उल्लंघन केले असून त्यांचा जामीन रद्द करा ही मुंबई पोलिसांची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी पोलिसांच्या अर्जावर सोमवारी निर्णय देताना त्यांची मागणी फेटाळली.

राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीचे राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करून पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावरील युक्तिवादासाठी दोघे किंवा त्यांच्यावतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यावेळी राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची मागणीही विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली होती.

दोघे एकदाही सुनावणीला उपस्थित राहिलेले नाहीत. राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत. त्यांना आता कोणीच काही करू शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे, असा आरोपही सरकारी वकिलांनी केला होता.

Story img Loader