मुंबई : दहशवादी संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीमच्या (एबीटी) सदस्यांना मदत केल्याच्या आरोपाप्रकरणी तीन बांगलादेशी नागरिकांना विशेष न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले. ऑक्टोबर २०२३ मध्ये, न्यायालयाने या प्रकरणात आणखी दोन आरोपींना दोषी ठरवले होते व त्यांनाही पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा…मुंबईकचरामुक्तीच्या दिशेने शहरातील कचरा निर्मिती, विल्हेवाटीसाठी पालिकेचा अभ्यास; अनुभवी संस्थेची लवकरच नेमणूक

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, अनेक बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी मार्च २०१८ मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला. पुण्यातील धोबीघाट, भैरोबा नाला येथून पोलिसांनी हबीबला अटक केली आणि त्यानंतर या प्रकरणात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास मे २०१८ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग झाला. तपासात अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक भारतात वैध कागदपत्राशिवाय राहत असल्याचे आढळून आले. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर पॅन कार्ड, आधार ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका इत्यादी मिळवले होते आणि त्यांचा वापर भारतीय सिमकार्ड मिळविण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी तसेच नोकरी मिळविण्यासाठी केल्याचा आरोप एनआयएने ठेवला होता. याशिवाय, सर्व आरोपी एबीटीच्या सदस्यांच्या संपर्कात असून त्यांना आश्रय आणि निधी दिल्याचे पुढील तपासात उघड झाल्याचेही एनआयएचा आरोप होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court sentenced three bangladeshi nationals to five years in prison for aiding al qaedas ansarullah bangla team mumbai print news sud 02