मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना १ नोव्हेंबरपासून नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक करोना वर्धक लसीची मात्रा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.
मुंबईतील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे २४ लसीकरण केंद्रांवर २८ एप्रिल २०२३ पासून ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर २३ जून २०२३ पासून आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक करोना लसीची वर्धक मात्रा देण्यात येत आहे.
हेही वाचा >>> मुंबई : मुलुंडमधील उद्यानातील शौचालयात सापडला महिलेचा मृतदेह
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता ही लस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे १ नोव्हेंबरपासून इन्कोव्हॅक ही लस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. मुंबईतील पात्र नागरिकांनी इन्कोव्हॅक लसीची वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांसाठीच ही मात्रा
कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच इन्कोव्हॅक लसीची वर्धक मात्रा घेता येणार आहे. कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची वर्धक मात्रा घेता येईल. कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लसीसाठी वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.