संतोष प्रधान, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : सोलापूरमध्ये २०१९ मध्ये घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याबद्दल मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने तत्कालीन राज्य सचिव व  माजी आमदार नरसय्या आडम यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली होती. येत्या शुक्रवारी पुन्हा मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात आडाम कोणती भूमिका घेतात आणि त्यावर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व किती गांभीर्याने भूमिका घेते याची डाव्या वर्तुळात उत्सुकता आहे. 

हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदींचंही वय झालं, अजित पवार त्यांना…”; वयोमानावरुन नाना पटोले यांची खोचक टीका

सोलापूरमध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोलापूरमधील रे रोड परिसरात उभारण्यात आलेल्या या घरकुलांसाठी  आडम मास्तर यांनी पुढाकार घेतला आहे. या घरांचा भूमिपूजन समारंभ ९ जानेवारी २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता. तेव्हाच उद्घाटनाला मी उपस्थित राहीन, असे मोदी यांनी जाहीर केले आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या १५ हजार घरांच्या लोकार्पण सोहळयाला मोदी उपस्थित राहणार आहेत.  भूमिपूजन समारंभात आडम यांनी मोदी यांचे कौतक केले होते. ‘घरकुलांच्या या प्रकल्पाला काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने मंजुरी दिली नाही. पण पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ परवानगी देऊन केंद्राचा हिस्साही मंजूर केला होता. याबद्दल मी मोदी यांचे आभार मानतो’, असे आडम यांनी मत व्यक्त केले होते. महाराष्ट्राच्या राज्य सचिवाने मोदी यांचे कौतुक केल्याबद्दल माकपमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. आडम यांना राज्य सचिव आणि केंद्रीय समितीचे सदस्य या दोन्ही पदांवरून तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते.

शुक्रवारच्या कार्यक्रमात मोदी यांचे फक्त आभार मानावेत, त्यांचे जास्त कौतुक करू नये, अशा सूचना पक्षाने आडम यांना केल्याचे समजते.

आडम यांच्याकडून तेव्हा भावनेच्या भरात चूक झाली होती. यामुळेच पक्षाने कारवाई केली होती. आडाम यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या घरकुल योजनेत केंद्र व राज्याचाही हिस्सा आहे. आडाम यांच्या पक्षनिष्ठेबद्दल तिळमात्रही शंका नाही.

 – डॉ. अशोक ढवळे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cpm instructed former mla narasayya adam to thank pm modi not praise him too much zws