‘रोज ‘मरे’ त्याला कोण रडे..’ ही म्हण सध्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तंतोतंत लागू पडत असल्याचे दिसत आहे. दर दिवशी १५ ते २० मिनिटे उशिराने धावणाऱ्या मध्य रेल्वेकडे १०१ नवनवीन कारणे तयारच असतात. बुधवारी कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रखडलेली मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा गुरुवारी पेंटोग्राफ तुटल्यामुळे पुन्हा एकदा कोलमडली. या घटनेचे पडसाद दिवसभराच्या उपनगरीय सेवेवर पडले. सकाळी गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या २३ उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्याने सगळ्याच स्थानकांवर प्रवाशांची झुंबड उडाली होती. कळवा, मुंब्रा, दिवा येथील प्रवाशांना तर गाडी पकडण्यासाठी डोंबिवली गाठावे लागले. हे ‘हाला’हल पचवत आपापली कार्यालये गाठणे गुरुवारी मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या नशिबात होते.
अंबरनाथवरून मुंबईला येणाऱ्या धीम्या लोकलचा पेंटोग्राफ गुरुवारी सकाळी ६.४० वाजता डोंबिवली स्थानकातच तुटला. ही गाडी डोंबिवली स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनला उभी असताना हा प्रकार घडल्याने या प्लॅटफॉर्मवर कोणतीही गाडी येणे शक्य झाले नाही. परिणामी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व धीम्या गाडय़ा कल्याण ते मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येत होत्या. त्यामुळे अप धीम्या आणि अप जलद या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती.
डोंबिवली ते ठाणे या स्थानकांदरम्यान धीम्या गाडय़ा जलद मार्गावरून जात असल्याने या गाडय़ा कोपर, दिवा, कळवा आणि मुंब्रा या स्थानकांवर थांबत नव्हत्या. त्यामुळे या स्थानकांवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी डोंबिवलीकडे यावे लागत होते. डोंबिवली स्थानकात तुटलेला हा पेंटोग्राफ दुरुस्त करून अडकलेली लोकल मार्गी लावण्यासाठी तब्बल साडेतीन तास लागले.

Story img Loader