देशभरात विविध राज्यांमध्ये इंडिया आघाडीत उभी फूट पडलेली असताना आता महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर याला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि या मतदारसंघासाठी उमेदवारी मागण्यासाठी आग्रही असलेले संजय निरुपम यांनी मात्र उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. करोना काळात गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी खासदार संजय निरुपम यांनी एक्सवर पोस्ट टाकून शिवसेनेवर टीकास्र सोडले. ते म्हणाले, “काल शिल्लक शिवसेनेने अंधेरीतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केला. अद्याप जागावाटप झालेले नाही, तरी उबाठा गटाकडून अशी उमेदवारी कशी जाहीर केली जाऊ शकते? असा सवाल आता लोक उपस्थित करत आहेत. मविआच्या दोन डझन बैठका झाल्या असून अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. ज्या ८-९ जागांची चर्चा बाकी आहे, त्यात या मतदारसंघाचाही समावेश आहे, अशी माहिती माझ्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांनी दिली. मग शिवसेनेकडून जर एकतर्फी उमेदवारी जाहीर होत असेल तर हा आघाडीच्या धर्माचे उल्लंघन आहे.”
संजय निरुपम म्हणाले की, उबाठा गटाने ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते अमोल किर्तीकर हे भ्रष्टाचारातील आरोपी असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केला होता. मात्र ठाकरे गटाच्या लोकांना हे खिचडी वाटप करण्याचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात कमिशन खाल्ल्याचा आरोप अमोल किर्तीकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गरीब कामगारांची खिचडी खाणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर ठाकरे गट ठाम का आहे?
संजय निरुपम यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उबाठा गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी संजय निरुपम यांच्यावर पलटवार केला. “उत्तर पश्चिम लोकसभा जागा शिवसेनेने जिंकली होती. आज असो वा उद्या उमेदवारी मागायचा आमचा हक्क आहे. संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर भूमिका व्यक्त करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाशी चर्चा करावी. काँग्रेस आता त्यांना किती गांभीर्याने घेते, हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. शिवसेना ज्या जागेवर विजयी झाली होती, त्या जागा शिवसेना महाविकास आघाडीत मागत आहे, असे आनंद दुबे यांनी संजय निरुपम यांना प्रत्युत्तर दिले आहे.