मुंबई : पावणेचार कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार झाल्याचा प्रकार दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे घडला. यादव चंद्रपाल असे आरोपी कारगिराचे नाव असून त्याच्याविरोधात लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने विश्वास संपादन करून दागिने बनविण्यासाठी, दुरुस्तीसाठी तसेच पॉलिश करण्याच्या नावाखाली घेऊन सात सराफ व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस तपास करत आहेत.

तक्रारदार केसरसिंह मोडासिंह खरवड हे मालाड परिसरात रहिवासी असून व्यवसायाने सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यादव चंद्रपाल हा त्यांचा परिचित कारागिर असून अनेकदा ते त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. यादवचा झव्हेरी बाजार येथील मांडवी परिसरातील जैनाब हाऊस येथे दागिने निर्मितीचा कारखाना आहे. कमी किमतीत चांगले दागिने बनवणाऱ्या यादवने सर्वांचाच विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्याच्याकडे खरवड यांच्यासह त्यांचे परिचित सराफ दागिने बनविण्यासाठी देत होते. ६ फेब्रुवारी ते १८ एप्रिल २०२४ या कालावधीत त्यांच्यासह त्यांचे सराफ व्यापारी मित्र निलेश कांतीलाल जैन, संकेत सुशील डांगी, विकेश चंपालाल जैन, पियुष सोनी, जिनेश पारेख, निलेश कांतीलाल जैन अशा सातजणांनी यादव चंद्रपालला पावणेचार कोटीचे ५ किलो १९२ ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी, दुरुस्तीसाठी तसेच पॉलिश करण्यासाठी दिले होते.

हेही वाचा – विधानसभेसाठी ‘वंचित’ची स्वबळाची चाचपणी

हेही वाचा – नऊ जागा जिंकण्याचे महायुतीचे उद्दिष्ट; विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान

नेहमीप्रमाणे त्यांना वेळेत दागिने मिळाले नाहीत. वारंवार विचारणा करुन तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. अखेर यादव पावणेचार कोटीचे दागिने घेऊन पळून गेल्याचे समजले. हे समजल्यानंतर खरवड यांनी त्याच्या झव्हेरी बाजार येथील कारखान्यात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना यादव पळून गेल्याचे समजले. या घटनेनंतर त्यांच्यासह इतर सहा सराफ व्यापार्‍यांनी एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर यादव चंद्रपाल याच्याविरुद्ध पावणेचार कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन सात सराफ व्यापार्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ६ फेब्रुवारी ते १८ एप्रिल या कालावधीत यादवला दागिने देण्यात आले होते. दीड महिन्यानंतरही त्याने दागिने परत न केल्यामुळे सर्वांना संशय आला. आरोपी कारागिराचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच एक पथक परराज्यातही पाठवण्यात येणार आहे.