लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एक मोटारगाडी आणि एका दुचाकीवर क्रेन कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
गेल्या काही वर्षापासून चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासस्थळी क्रेनच्या माध्यमातून विविध कामे करण्यात येत आहेत. येथील इमारत क्रमांक ३५ जवळ शुक्रवारी सायंकाळी ट्रकमधील लोखंडी सळ्या क्रेनने उतरवण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक क्रेन कोसळली आणि जवळच उभ्या असलेली एक मोटारगाडी आणि दुचाकीवर पडली. सुदैवाने यावेळी मोटारगाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अपघातात मोटारगाडी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची नोंद केली आहे.