दैनंदिन आयुष्यातील गरजेच्या वस्तू मिळण्याचे दक्षिण मुंबईतील बाजारपेठ म्हणजे महात्मा जोतिबा फुले मंडई. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रॉफर्ड मार्केटचा समावेश (सध्याचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई) मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाजारांमध्ये होतो. १८६८ मध्ये ही वास्तू बांधण्यात आली. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव या बाजाराला देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून क्रॉफर्ड मार्केटच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. सध्या काही भागाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून या पूर्वीपेक्षा सुसज्ज क्रॉफर्ड मार्केट ग्राहक अनुभवत आहेत.

क्रॉफर्ड मार्केटची संरचना ही ब्रिटिशकालीन आहे. बाजारपेठेत प्रत्येक वस्तूचे स्वतंत्र विभाग असल्याने खरेदी करणे सोपे जाते. भाज्या, फळे, सुकामेवा, सौंदर्यवृद्धीचे साहित्य, घरगुती वापराच्या वस्तू यांच्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत. सध्या नाताळ आणि नववर्षांचे वातावरण असल्याने बाजाराला उधाण आले आहे. त्यातही चॉकलेट, मिठाई, सरबत, फळांची वाइन या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारपासूनच मोठी गर्दी झाली आहे. दिवसेंदिवस मॉलचे प्राबल्य वाढत असतानाही क्रॉफर्ड मार्केटसारख्या पारंपरिक बाजारांमध्ये मोठी गर्दी होते. या बाजारात अगदी सर्वसामान्यांपासून उच्च गटातील व्यक्तीही खरेदी करण्यासाठी येतात. १४७ वर्षांपूर्वी ही वास्तू बांधण्यात आली. इतक्या वर्षांत याच्या संरचना शाबूत आहे. सुरुवातीला पारसी आणि मराठी व्यावसायिक या बाजारात व्यापार करत. आतही या दुकानांवरील पाटीवर मराठी माणसांची नावे दिसतात. भाज्या, फळे, सुगंधी द्रव्ये, सुकामेवा, खाद्यपदार्थ, प्रवासी बॅग, महिलांसाठी ड्रेसेस, सजावटीच्या वस्तू, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू कमी किमतीत येथे उपलब्ध होतात. मुंबापुरीत येणाऱ्यांसाठी या बाजारात फेरफटका मारणे आणि खरेदी करणे, हा एक सुखद अनुभव असतो.

Godrej Consumer shares beneficiary
ससा-कासवाची गोष्ट : ‘गोदरेज कन्झ्युमर’चा शेअर अर्थसंकल्पाचा लाभार्थी ठरेल?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Share Market
येत्या आठवड्यात कशी असेल Share Market ची कामगिरी? अर्थसंकल्पासह ‘हे’ ३ घटक ठरणार महत्त्वाचे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
Indian stock market marathi news
Marker roundup : शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ; दलाल स्ट्रीटला धडाकेबाज Budget 2025-26 ची आस?
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
ITC Hotels Limited shares listed on the stock exchange print eco news
आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्सचा भाव तीन अंकी सूर मारेल?  बाजारात शेअर्सचे लिस्टिंग येत्या बुधवारी

या बाजारात प्राणी व पक्ष्यांच्या विक्रीसाठी स्वतंत्र गल्ली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर या व्यवसायावर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या केवळ पाळीव प्राण्यांचे खाद्य, पिंजरा किंवा अन्य उपयोगी वस्तूंची दुकाने सुरू आहेत. या भागात सुक्या मेव्याचीही अनेक दुकाने आहेत. वेगवेगळ्या दर्जाचा तसेच प्रकारचा सुकामेवा येथे मिळतो. त्यापुढेच शेवटच्या गल्लीत भाज्या आणि फळांची दुकाने आहे. येथे भारतात पिकवल्या जाणाऱ्या फळांबरोबरच परदेशांतून आयात होणारी फळेही मिळतात. डिसेंबर महिन्यातही या बाजारात हापूस आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सध्या या हापूस आंब्यांचा दर एका डझनामागे २५०० रुपये इतका आहे. याबरोबरच काळ्या रंगाची चेरी, ड्रॅगन, यांसारखी फळेही येथे सहज उपलब्ध होतात. या बाजारातील चॉकलेट विभागात मात्र कायम गर्दी असते. सध्या नाताळसणामुळे या बाजारात पाय ठेवण्यासही जागा नाही. याच ठिकाणी फळांपासून बनवलेल्या वाइनपासून विविध प्रकारचे सरबत विक्रीस ठेवण्यात आले आहेत. याखेरीज सौंदर्य प्रसाधनांचीही अनेक दुकाने येथे आहेत. यातील बहुतांश दुकानांत विक्रीस ठेवलेला माल हा कमी किमतीचा आहे. कारण हे साहित्य मूळ ब्रॅण्डची नक्कल असते.

मार्केटच्या बाहेर फूटपाथवर बॅगाच्या दुकानांची रांग असते. येथे मोठय़ा बॅगापासून महिलांचे पर्सेस मिळतात. क्रॉफर्ड मार्केटच्या समोरही मोठी बाजारपेठ भरते. दक्षिण मुंबईतील ही बाजारपेठ मध्यभागी असून येथील मंगलदास, मनीष मार्केट, जव्हेरी बाजार, तांबा-काटा मार्केट, भेंडी बाजार जवळ आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील बाजारपेठेत सुमारे १५०० दुकाने आहेत. गेल्या अनेक वर्षांत ही दुकाने अधिक प्रशस्त झाली आहेत. खरेदीसाठी रोख नसल्यास एटीएम कार्डचा वापर करता येऊ शकतो. ग्राहकांच्या सोयीसाठी या बाजारात मोठी टोपली धारक व्यक्ती फिरताना दिसतात. ही व्यक्ती ग्राहकांच्या मागे मागे फिरत असतो. आणि त्यांचे सामान आपल्या टोपलीत घेऊन अगदी गाडीपर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. या कामासाठी आलेले अधिकतर कामगार हे उत्तरप्रदेशातील आहेत. फळबाजारातही उत्तर प्रदेशातील कामगारांचा प्रभाव जास्त दिसतो. वर्षांनुवर्षे ग्राहकांची इच्छा पूर्ण करणारा हा बाजार नूतनीकरणातून अधिक खुलला आहे. यापुढेही अनेक वर्षे हा बाजार ग्राहकांबरोबरच दुकानदार आणि कामगारांच्या आशा अपेक्षा पूर्ण करेल यावर विश्वास आहे.

‘बाजारगप्पा’ सदरातील क्रॉफर्ड मार्केट हा शेवटचा बाजार आहे. लोकांच्या पसंती बदलल्या त्यानुसार बाजारही बदलत गेले. बऱ्याच लोकांना बाजाराने स्वीकारले, त्यांना घडवले. मुंबईचे स्वरूप बदलत असताना बाजारांमध्येही बदलाचे वारे वाहू लागले. एकेकाळी परप्रांतीय खरेदी करण्यासाठी मुंबईची वाट धरीत होते. आजही मुंबईत आलेल्या नवा पाहुण्याला या बाजाराचे आकर्षण वाटते. एकदा तरी या बाजाराची भेट घेण्याची इच्छा असते. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसोबत मारलेल्या गप्पांमधून बाजाराचे गुपित कळू लागते. गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्या गरजा भागवण्याचे ठिकाण म्हणजेच  ‘मुंबईतील बाजार’ येत्या काही वर्षांत नव्या बदलांनी मुंबईकरांना आश्चर्यचकित करेल हे नक्की.

Story img Loader