लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कर्णबधिरांना विविध समस्यांवर मात करता यावी, त्यांच्या अडीचडचणी सोडविण्यासाठी आणि शासनातर्फे कर्णबधिरांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व निर्णयांची माहिती देण्यासाठी मुंबईतील अमन आझाद यांनी news4deaf.com या विशेष संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. तसेच भारतातील कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सर्व शाळांमध्ये अमेरिकन सांकेतिक भाषा शिकविण्यात यावी, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. अमेरिकन सांकेतिक भाषा शिकल्यामुळे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक देवाण-घेवाण आदी विविध मार्ग खुले होतील, असा विश्वास अमन आझाद यांना आहे.
अमन आझाद यांनी सुरू केलेल्या news4deaf.com या विशेष संकेतस्थळावर कर्णबधिरांसाठीच्या सरकारी योजना, निर्णय, सांकेतिक भाषांबद्दल माहिती, कर्णबधिरांसाठीच्या औषधोपचारांची माहिती, बातम्या, पर्यटनक्षेत्राबद्दल माहिती, कर्णबधिरांना त्यांच्याशी संबंधित विविध उत्पादने विकत घेण्यासाठी ऑनलाइन उत्पादने विकणाऱ्या एका संकेतस्थळाची लिंकही देण्यात आली. तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही या संकेतस्थळावरून करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर इंग्रजीसह मराठी, हिंदी आदी विविध प्रादेशिक भाषांचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच संकेतस्थळासह समाजमाध्यमावर खाते व युट्यूब वाहिनीही सुरू करण्यात आली आहे.
आणखी वाचा-पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
कर्णबधिरांना विविध माहिती एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भारतातील कर्णबधिर विद्यार्थ्यांना विविध मार्ग खुले व्हावे, कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सर्व शाळांमध्ये अमेरिकन सांकेतिक भाषा शिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, असे अमन आझाद यांनी सांगितले.