अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला शुक्रवारी नवे वळण मिळाले. प्रकरणात आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी सुनील माने यांनी त्यावेळी माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे विशेष न्यायालयाला सांगितले. देशातील बडे उद्योगपती असलेले मुकेश अंबानी प्रकरणात क्रिकेट बुकींचाही समावेश आहे, असे कोणी सांगितल्यास विश्वास बसणार नाही.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने या संपूर्ण प्रकरणात वापरलेले सिमकार्ड सट्टेबाजांकडून मिळाल्याचा आरोप आहे. त्यात  गुजरातमधील कुप्रसिद्ध सट्टेबाज नरेश गौर याचा वापर वाझेकडून करण्यात आला. सट्टेबाजीचा संपूर्ण व्यवसाय बेनामी सिमकार्डने चालतो हे वाझेला माहीत होते, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये त्याने नरेशला काही सिमकार्ड देण्यास सांगितले होते. या संपूर्ण प्रकरणात सट्टेबाजाकडून देण्यात देण्यात आलेल्या सिमकार्डचा वापर करण्यात आला होता.  नरेशने गुजरातमध्ये त्याच्या ओळखीच्या एका मोबाइल गॅलरी मालकाकडून मोठी रक्कम देऊन १५ सिमकार्ड खरेदी केले होते. त्यातील पाच सिमकार्ड सचिन वाझेच्या सांगण्यानुसार बाजूला काढण्यात आले. ते सिमकार्ड निलंबित हवालदार विनायक शिंदे यांच्यामार्फत वाझेला मिळाले होते. सचिन वाझेपर्यंत पोहोचणारे सिमकार्ड सुरू आहेत की नाही, हे तपासण्यासाठी नरेश गौरने दोनवेळा सिमकार्ड मोबाइलमध्ये टाकून त्याची तपासणी केली. हाच याप्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरला. त्याच धाग्याच्या मार्फत दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी गौपर्यंत पोहोचले व त्यामार्फत सचिन वाझेपर्यंत पोहोचले. याप्रकरणात वापरण्यात आलेल्या सिमकार्डमुळे गौरचाच नाही, तर शिंदेचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पण सचिन वाझेसारख्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना भक्कम पुराव्यांची आवश्यकता होती. मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या दिवशी सचिन वाझेचा मोबाइल ५० किलोमीटर दूर, मुंबई पोलीस आयुक्तालयात असल्याचे निष्पन्न झाले. पण जीपीओ कार्यालयाच्या मुख्यालयाजवळील सीसीटीव्हीमुळे सचिन वाझेचे िबगही फुटले. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणात सचिन वाझे सीएसटी स्थानक परिसरात जात असताना दिसून आले. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सचिन वाझेचाही याप्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या दिवशी म्हणजे ४ मार्च २०२१ रोजी सायंकाळी वाझे पोलीस मुख्यालयातून निघून ठाण्याला गेला. तावडे नावाने मनसुख हिरेनला दूरध्वनी करून घटनास्थळी बोलावरून घेतले व त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने हिरेनचा काटा काढला. रात्री पावणे बाराच्या सुमारास वाझे मुख्यालयात आला व त्याने स्वत:चा मोबाइल घेऊन डोंगरी येथील एका बारवर छापा टाकला. पण या ‘परफेक्ट मर्डर’मध्ये काही त्रुटी राहिल्या. सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे हिरेनला दूरध्वनी करण्यात आलेले सिमकार्ड गौरने त्यापूर्वी त्याच्या मोबाइलमध्ये टाकून त्याची तपासणी केली होती. हाच दुवा पकडून एटीएसचे अधिकारी गौपर्यंत पोहोचले व पुढे या संपूर्ण गुंता सुटला.

 अँटिलियाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी उभी होती. स्कॉर्पिओच्या मागे गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाची गाडी होती. वाझे त्यावेळी या विभागाचे प्रमुख होते. इनोव्हा आणि स्कॉर्पिओचे चालक अँटिलियाला पोहोचण्याच्या अर्धा तास आधी सायन सर्कल येथे १.४२ वाजता चार मिनिटे भेटले. हा दुसरा महत्त्वपूर्ण धागा एटीएसच्या हाती लागला. शीव सर्कल येथे भेटण्यापूर्वी इनोव्हा आणि स्कॉर्पिओ मध्ये सुमारे ३०० मीटरचे अंतर होते. त्यावेळी गौरने दिलेल्या सिमकार्डचा वापर झाला. त्यामुळे ही माहिती डंप डेटाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या हाती लागली आणि वाझेचा याप्रकरणातील सहभाग उघड झाला. पुढे याच माहितीच्या आधारे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) वाझेला मनसुख हिरेन खुनाप्रकरणी अटक केली. नंतर सुनील मानेपर्यंत एनआयएचे अधिकारी पोहोचले. ज्याच्यामुळे हिरेन याच्या खुनाचे आणि अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचे गौडबंगाल उघडकीस आले तो नरेश गौर हा गुजरातमधील सट्टेबाज आहे. वाझे सीआययू प्रमुख असताना सामन्यादरम्यान आपल्यावर कारवाई करू नये यासाठी अनेक सट्टेबाज वाझेच्या संपर्कात होते. त्यातील नरेश गौर हा सट्टेबाज होता. त्या काळात गुजरातमधून तो सट्टेबाजांचे जाळे चालवत होता.

गुजरातमधील या नेटवर्कची उलाढाल अरबो रुपयांची आहे. या जाळय़ातील काही हस्तक ठाणे व मुंबई परिसरात असल्यामुळे गौर वाझेच्या संपर्कात आला होता. सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणारे मोबाइल, बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी करण्यात आलेल्या सिमकार्डवर चालते. त्यामुळे गौरकडे बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेले सीमकार्ड सहज उपलब्ध होतील याची माहिती वाझेला होती. त्यामुळे त्याने गौरशी संपर्क साधला. वाझेचा त्यावेळचा मुंबई पोलीस दलातील दरारा पाहता गौरही त्याला नकार देऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket bookie involvement in antilia explosive case zws
Show comments