मुंबई : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, चेंडूगणिक काळजात होणारी धडधड आणि असंख्य अपेक्षांचा झालेला भंग असे निराशनजक चित्र रविवारी भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये पाहायला मिळाले. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखत भारताचा पराभव केला आणि तब्बल सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. मुंबईतील क्रिकेटप्रेमींनी चाळीच्या पटांगणात, मैदानात तसेच इमारतींच्या गच्चीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून मोठय़ा पडद्यावर हा ऐतिहासिक सामना अनुभवला. क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढविण्यासाठी ढोल – ताशे, बँजो, आकर्षक रोषणाई, राष्ट्रध्वज आणि टॅटू काढण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अपेक्षांचा भंग होऊन पराभवाचा धक्का बसल्यानंतर शहरात सर्वत्र भयाण शांतता पसरली आणि अनेकांना आपसूकच रडू कोसळले.
हेही वाचा >>> WC 2023 : विराटने अनुष्काला मिठी मारली आणि.., अंतिम सामन्यातल्या पराभवानंतरचा ‘तो’ फोटो व्हायरल
भारताला पाठिंबा तसेच प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांनी सामाजिक माध्यमांवर विविध पोस्ट, रिल्स अपलोड केल्या होत्या. तसेच भारतीय संघाचे टी-शर्ट, टोपी व राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी दुकानांमध्ये क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याचबरोबर मॉल्स, मोठमोठी उपाहारगृहे, पब आदी ठिकाणी मोठय़ा एलइडी स्क्रीनवर अंतिम सामन्याचे प्रक्षेपण करण्यासह आकर्षक सवलतीही देण्यात आल्या होत्या. दुपारी दोन वाजल्यानंतर जसजसे क्रिकेटप्रेमींचे डोळे अंतिम सामन्याकडे लागले, तसतसे एरव्ही गर्दीने खचाखच भरलेले रस्ते ओस पडत गेले. भारतीय खेळाडूंनी धावा, चौकार, षटकार आणि बळी टिपल्यानंतर एकच जल्लोष होत होता. टाळय़ांचा कडकडाट, पिपाणी वाजविण्यासह घोषणाबाजीही पाहायला मिळाली. परंतु काही वेळानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड घेण्यास सुरुवात केली, तेव्हा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गोटात अक्षरश: भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि धाकधूक वाढत गेली. दरम्यान, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात टीव्हीवर तसेच मोकळय़ा मैदानात मोठय़ा एलइडी स्क्रीनवर विशेष स्क्रििनगची व्यवस्था केली होती. मुंबईतील दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कसह शहरातील मध्यवर्ती ठिकाणी, नाक्यानाक्यांवर स्क्रििनगसह अल्पोपहार तसेच भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी स्क्रििनगच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पीव्हीआरसारखे मल्टिप्लेक्स चित्रपटगृहही क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. काहींनी घरीच टीव्हीवर सहकुटुंब सामना पाहिला. या अंतिम सामन्याच्या निमित्ताने कुटुंबियांचे एकप्रकारे ‘गेट टू गेदर’च झाले. यावेळी विविध पदार्थाचा आस्वाद घेण्यासह गप्पांचा फडही रंगला होता. २०२३ च्या संपूर्ण क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा विजयरथ सुसाट धावत होता, त्यामुळे अंतिम सामना हा भारतीय संघच जिंकेल, असा विश्वास भारतीय क्रिकेटप्रेमींना होता. विजयाचा क्षण साजरा करण्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, तब्बल १२ वर्षांनंतरही क्रिकेट विश्वचषक विजयाचे स्वप्न अधुरे राहिल्यामुळे क्रिकेटप्रेमींचा अक्षरश: हिरमोड झाला.