झेंडे विक्रेत्यांची लगबग.. टीशर्ट-टोप्या विकणारे व टॅटू काढणाऱ्यांभोवती चाहत्यांची गर्दी.. भोंग्यांच्या आवाजाने वानखेडेचा दणाणलेला परिसर.. सकाळपासूनच झालेली गर्दी आवरताना पोलिसांची उडालेली तारांबळ.. तर, सामन्याच्या तिकिटांचा चोरटा काळाबाजार.. हे दृश्य वानखेडे स्टेडियम परिसरात गुरुवारी सकाळी १२ वाजल्यापासून पाहण्यास मिळत होते. निमित्त होते सायंकाळी होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक सामन्याचे. भारतीय व परदेशी चाहत्यांच्या उपस्थितीने वानखेडेचा परिसर ‘क्रिकेटमय’ झाल्याचे दृश्य दिसत होते.
भारतविरुद्ध वेस्ट इंडीज हा ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकानिमित्त उपांत्य फेरीसाठी होणारा सामना गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. सायंकाळी सातच्या या सामन्याला मात्र सकाळी १२ वाजल्यापासूनच क्रिकेट चाहत्यांची गर्दी झाल्याने सामन्यापूर्वीचे वातावरण रंगण्यास सुरुवात झाली होती. वानखेडे स्टेडियमच्या सर्वच प्रवेशद्वारांवर त्यामुळे पोलिसांनी सामान्यांना बंदी घातली होती व तिकीटधारकांना प्रवेश देण्यात येत होता. या वेळी सामन्यासाठी आलेल्या चाहत्यांचा क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर व विशेषत चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ विक्रेत्यांची गर्दी झाली होती. भारताचे विविध आकाराचे झेंडे, भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांचे टॅटू, भारतीय संघाचे टीशर्ट-टोप्या, भोंगे व झेंडय़ांच्या पट्टय़ा आदींची चढय़ा दराने विक्री करण्यात येत होती. यात आयसीसीतर्फे नेमण्यात आलेल्या विक्रेत्यांकडून विकण्यात येणाऱ्या टीशर्ट व टोप्यांना चाहत्यांकडून अधिक मागणी होत होती. मात्र, भारतीय संघाचे जुन्याच रंगातील टीशर्ट विक्रीला असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, यामुळे प्रवेशद्वारांवर चाहत्यांची गर्दी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. अखेर पोलिसांना वारंवार घोषणा करून चाहत्यांना दूर लोटावे लागत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा