मुंबई : तंत्रशुद्ध, तरीही आक्रमक फलंदाजी आणि कल्पक नेतृत्वाच्या जोरावर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने भारतीय क्रिकेटविश्वात आणि क्रिकेटप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले. पण, या वलयांकित क्रिकेटपटूची नाळ आजही माती आणि शेतीशी घट्ट जुळलेली आहे. अजिंक्य रहाणेच्या अशा ज्ञात आणि अज्ञात पैलूंची उकल ‘लोकसत्ता गप्पा’च्या माध्यमातून केली जाईल. बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी मुंबईत या गप्पा रंगतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केसरी टूर्स सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर लागू बंधू असून, बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड हे आहेत. कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव आहे. क्रिकेटप्रेमी ज्येष्ठ रंगकर्मी विनय येडेकर आणि ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर अजिंक्यशी संवाद साधतील.

मूळच्या डोंबिवलीकर अजिंक्य रहाणेने मुंबई क्रिकेटमध्ये विविध वयोगटांत नैपुण्य मिळवले. पुढे मुंबईसाठी रणजी हंगामात सातत्याने कामगिरी करत अजिंक्यने भारतीय संघात स्थान मिळवले आणि पक्के केले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा ‘अजिंक्यतारा’ तळपला.  भारतीय फलंदाजांचा निभाव परदेशी मैदानांवर सहसा लागत नाही, या समजाला अजिंक्य नेहमीच खणखणीत अपवाद ठरला. फलंदाजीइतकीच नेतृत्वातही अजिंक्यने संधी मिळेल तशी आणि तेव्हा चमक दाखवली. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील भारताच्या दिमाखदार मालिका विजयाचा अजिंक्य एक सूत्रधार होता.

क्रिकेटच्या बरोबरीने अजिंक्यची ओळख एक सर्वस्नेही सामान्य माणूस अशीही आहे. शेती, माती, शेतकरी यांच्याविषयी त्याला विलक्षण जिव्हाळा वाटतो. अजिंक्यचा हा पैलू फारसा ज्ञात नाही. शेतकरी कुटुंबातून आल्याची जाणीव आणि अभिमान अजिंक्यपाशी आहे. शेती आणि शेती तंत्रज्ञानाशी संबंधित नवउद्यमींना त्याने गुंतवणुकीच्या माध्यमातून मदत केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने उभे राहण्याचा गुण आपण शेतकऱ्यांकडून शिकलो, असे त्याने नमूदही केलेले आहे.

‘लोकसत्ता गप्पा’तील मान्यवरांची मांदियाळी’ 

विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अनौपचारिक संवादसेतूच्या माध्यमातून विचारसंचित जोडणे हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमाचा एक हेतू आहे. या वाचकप्रिय उपक्रमात आजवर विख्यात साहित्यिक-विचारवंत एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक व संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे, अभिजात गायक पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-गीतकार व विचारवंत जावेद अख्तर, चिंतनशील अभिनेते नसिरुद्दीन शहा, कवी-गीतकार गुलजार, रंगरेषाकार सुभाष अवचट, गानविदुषी प्रभा अत्रे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, प्रयोगशील शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान, विख्यात क्रिकेट समालोचक-संवादक हर्ष भोगले, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली असे प्रतिभावंत सहभागी झाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket player ajinkya rahane in loksatta gappa event on wednesday zws
Show comments