पैसा लपविण्यासाठी खोटय़ा कंपन्या स्थापून गैरव्यवहार केल्याच्या आरोपांप्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची प्राधान्याने चौकशी करण्यात येत आहे. तसेच या तक्रारीचे गुन्ह्यात रूपांतर करायचे की नाही याचा निर्णय दोन आठवडय़ात घेतला जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.
सोमय्या यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीची साधी दखलही न घेणाऱ्या मुंबई पोलिसांच्या निष्क्रियतेची खरडपट्टी काढत तपासाची सूत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश न्या. अजय खानविलकर आणि न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठाने मागच्या सुनावणीच्या वेळी दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर सोमय्या यांनी तटकरे यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून नव्याने ७०० पानांची कागदपत्रे सादर केली असून आणखी काही कागदपत्रे त्यांना सादर करायची आहेत. २६ फेब्रुवारी रोजी सोमय्या यांना जबाब नोंदविण्यासाठीही बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आधीच्या आणि नव्याने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या चौकशीसाठी दोन आठवडय़ांचा अवधी लागणार असून त्यानंतर सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीचे गुन्ह्यात रूपांतर करायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले.

Story img Loader