मुंबई : वायव्य लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत एकीकडे उद्धव ठाकरे गटातर्फे संशय व्यक्त केला गेला असून याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी, लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याच्या आरोपाप्रकरणी रविवारी रात्री उशिरा वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे, दोन्ही शिवसेनेतील या वादाला आणखी नवे वळण मिळाले आहे.

मुंबई वायव्य लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रवींद्र वायकर यांनी, तर महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. गोरेगाव येथील नेस्को केंद्र येथे ४ जून रोजी या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. मात्र, बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर अखेर वायकर यांना ४८ मतांच्या आघाडीने वियजी घोषित करण्यात आले. त्यानंतर, या मतदारसंघातील निकालाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच, ठाकरे गटाने मतदानयंत्राशी छेडछाड केल्याचा आरोप करून वायकर यांना विजयी घोषित करण्याबाबत संशय व्यक्त केला.

हेही वाचा >>>ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा; मतमोजणी केंद्रात शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकासह प्रवेश केल्याचा आरोप

दुसरीकडे, निवडणूक नियमांचे ठाकरे गटाकडून उल्लंघन झाल्याचा दावा वायकर यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आलेल्यांनाच मतदानाच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना पोतनीस यांनी वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी चार ते रात्री ८ या वेळेत प्रवेश केला. कीर्तिकर यांनीही मतमोजणी केंद्रात प्रेवश केला होता. याबाबत आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, असा दावा वायकर यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत नाही. असे असताना आणि तसे स्पष्ट आदेश असतानाही कीर्तिकर आणि पोतनीस यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करून मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वायकर यांनी केली.