मुंबईः अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या शाळेच्या बस चालकाला शीव पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन करीत होता. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनी आरोपी चालकाविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून पीडित मुलीला वारंवार त्रास देत होता. शाळेतून घरी येत असताना पीडित मुलीसोबत मस्ती करून तिला त्रास देत होता. तसेच पीडित विद्यार्थिनी बसमध्ये मागे बसली असता आरोपी तिला उठवून चालकाच्या शेजारच्या आसनावर बसायला बोलवायचा. तसेच पीडित मुलीचा भाऊ बसमध्ये असताना आरोपी त्याला खिडकीतून बाहेर बघण्यासाठी सांगून आरोपी पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करीत होता. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. ती शाळेत जाण्यास घाबरत होती. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ३ मार्च रोजी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. पण मुख्याध्यापकांनीही चालकाविरोधात अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे अखेर पीडित मुलीच्या आईने सोमवारी याप्रकरणी शीव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत शाळेच्या बसचा चालक व मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथकाने शीव कोळीवाडा परिसरातून आरोपीला अटक केली. तसेच याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करूनही त्याने आरोपी चालकाविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना भारती नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अंतर्गत नोटीस दिली आहे.