मॉडेल्स आणि नवोदित अभिनेत्रींना जाहिरातीचे आमीष दाखवून यांना गंडा घालणाऱ्या एका नृत्य दिग्दर्शकाला गुन्हे शाखा ८ने मुंबईतून अटक केली आहे. जीत सोनावणे (३६) असे त्याचे खरे नाव असून निशित जैन या नावाने त्याने मुंबईसह देशभरातील अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींना गंडा घातला होता. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे बनावट करार नामे,सिम कार्ड तसेच अनेक तरुणींच्या अश्लील चित्रफितीही सापडल्या आहेत.मुंबईतल्या सायरा अवस्थी नावाच्या नवोदित अभिनेत्रीला सोनावणे याने निशित जैन नावाने ६ नोव्हेंबरला फोन केला होता. मुंबईत इंडो जपना ज्वेलरी प्रदर्शन होत असून तनिष्क या प्रख्यात ज्वेलर्स साठी मॉडलिंग करण्याची ऑफर तिला दिली. या कामासाठी तिला एका दिवसाच्या चित्रिकरणासाठी सव्वा दोन लाख मिळतील असे सांगितले. ८ नोव्हेंबर रोजी तिला त्याने सहारा स्टार हॉटेलमध्ये चित्रिकरणासाठी बोलावले. त्यावेळी सायरा कडून त्याने पॅन कार्ड, वेशभुषेसाठी ६ हजार रोख तसेच तिची दोन छायाचित्रे घेतली. झेरॉक्स घेऊन येतो असे सांगुन त्याने तिथून पळ काढला. गुन्हे शाखा युनिट ८चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. २२ नोव्हेंबर रोजी कलिना येथील गॅ्रंट हयात या पंचतारांकित हॉटेल मध्ये जीत सोनावणे इतर तरुणींना फसविण्यासाठी येणार असल्याची माहिती फटांगरे आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून सोनावणेला अटक केली. त्याच्याकडून २ मोबाईल, ६ सीम कार्ड आणि २१मेमरी कार्ड, डिव्हीडी सापडल्या.

Story img Loader