लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : नाताळ व नववर्ष स्वागतानिमत्त होणारा जल्लोष या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबईत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या ३३ वर्षीय सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने पकडले. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या स सराईत आरोपीविरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने यापूर्वीही त्याला शस्त्रांसह अटक केली होती.
कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कक्ष-११ चे पोलीस हवालदार प्रवीण सावंत यांना एक संशयीत पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस हवालदार विजय देशमुख व पथकाने कांदिवली येथील डहाणूकर वाडी परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरूण येथे संशयीतरित्या वावरताना दिसला. त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिंवंत काडतुसे सापडली.
अबूतालीम आदम शफिऊल्लाह सय्यद (३३) असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. चौकशीत आरोपी पिस्तुल विकण्यासाठी तेथे आल्याचे निष्पन्न झाले. पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. आरोपी सराईत असून त्याच्याविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा त्यात समावेश आहे. आरोपीला गेल्यावर्षीही शस्त्रास्त्रांसह गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपी सराईत शस्त्र विक्रेता असल्याचा संशय असून त्याच्या चौकशीत शस्त्र विक्रेत्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.