मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने आता याप्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई, त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा कट रचला होता, तसेच गोळीबारानंतर अनमोल बिष्णोईने जबाबदारी स्वीकारली होती.
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळील गोळीबाराप्रकरणी गुन्हे शाखेने सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक केली होती. चंदर याची शेती व किराणा दुकान आहे. तसेच थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना सोनू व अनुजने पिस्तुल दिले होते. गुप्ता व पालला यापूर्वी गुजरातमधील भूज येथून अटक करण्यात आली होती. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते.
हेही वाचा…महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाल्यानंतर अनमोल बिष्णोई नावाच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट अपलोड करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी अनमोल विरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले. अनमोल विरोधात पंजाब व चंदीगडमध्ये सुमारे १२ ते १३ गुन्हे दाखल आहेत. सलमान खान प्रकरणातही संपूर्ण कट अनमोलने रचला होता. गोळीबार करणाऱ्यांना पैसे व पिस्तुल पाठवून दिल्याचा आरोप अनमोलवर आहे. अखेर शनिवारी याप्रकरणी सर्व सहा आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी करणार आहे. मोक्कानंतर आता गुन्हे शाखा लवकरच टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोईचा तुरुंगातून ताबा घेणार आहे.