मुंबईः कांजूरमार्ग येथील ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींना कांजूरमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डोक्यावर प्रहार करून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

राजेश मनबीरसिंह सारवण (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो चकाला रोड परिसरातील वाल्मिकी रहिवासी संघ येथील रहिवासी आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात रविवारी राजेशचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली.

हेही वाचा >>>मुंबईः कर्ज देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सेवा केंद्रावर छापा; ७ जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी याप्रकरणी पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी आला होता. एक व्यक्ती कारशेड परिसरात जखमी अवस्थेत पडल्याचे कांजूरमार्ग पोलिसांना कळवण्यात आले. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत राजेशला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करीत होती. तपासात रोहित राजेश चंडालिया (२९) व सागर राजेश पिवाळ (३०) यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडून कांजूरमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही ओरोपी विलेपार्ले पूर्व येथील रहिवासी आहेत.

Story img Loader