मुंबई : चारित्र्यावर आरोप करत आदल्या दिवशी लग्न मोडणाऱ्या तरुणाविरोधात साकीनाका पोलिसांनी फसवणूक, बदनामी केल्याबद्दल गुन्हा नोंदवला. मंगळवारी नोंदवलेल्या गुन्ह्य़ात अद्याप तरुणाला अटक झालेली नाही.
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला गेल्या वर्षी मे महिन्यात स्थळ आले. दोन्ही पक्षांकडून होकार येताच बोलणी सुरू झाली. त्यानुसार वधू पक्षाकडून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, हॉलवरील खर्च दोन्ही पक्षांनी समसमान उचलावा, असे ठरले. नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा आणि लग्न होणार होते. पण वर पक्षाकडे कौटुंबिक अडचण निर्माण झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आणि ते फेब्रुवारी महिन्यात ठरले. त्यासाठी तरुणीच्या वडिलांनी डोंबिवली येथील मंगल कार्यालय ठरवून त्यासाठीचे ८० हजार रुपयेही भरले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी आरोपी तरुणाने तरुणीच्या चारित्र्याविषयी गंभीर आरोप केले आणि तेच निमित्त करून लग्नास नकार दिला. तरुणीच्या वडलांसह नातेवाइकांनी समोरासमोर चर्चा करून गैरसमज दूर करावा, अशी विनंती तरुणाला आणि त्याच्या पालकांना केली. मात्र ही बोलणी फिसकटल्याने तरुणीच्या कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात आर्थिक फसवणूक आणि बदनामीबद्दल तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले.